Solapur Breaking | विरह संपला, प्रेम जिंकलं ; सोलापूर रेल्वे स्थानकावर आजी-आजोबांची भावूक भेट!
सोलापूर स्थानकावर भरून आलं माणुसकीचं आणि नात्याचं आकाश
सोलापूर - वयाच्या उत्तरार्धात माणसाला सर्वात जास्त गरज असते ती सोबत, आधार आणि आपुलकीची... पण कधी कधी छोट्याशा वादातूनही आयुष्याची दिशा बदलते. मंगळवारी (दि. ७) रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर घडलेली एक घटना मात्र या सत्याला वेदनादायी स्पर्श करून गेली—आणि त्याच वेळी माणुसकीचा उबदार हातही दाखवून गेली.विठ्ठल सम्राज जाधव (वय ८५, रा. स्वामी समर्थ मंदिर, निराळे वस्ती, सोलापूर) आणि त्यांची पत्नी पारूबाई जाधव (वय ८२) यांच्यातील किरकोळ वाद इतका वाढला की, विठ्ठल जाधव यांनी घरच सोडले.
आयुष्यभर साथ दिलेल्या पत्नीला मागे ठेवून ते कुठे गेले, याचा काहीच मागमूस नव्हता. गेल्या पाच दिवसांपासून ते सोलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरच एकटे, निराधारपणे दिवस काढत होते. गर्दीतही एकाकीपणाची चादर अंगावर घेत, आठवणींमध्ये हरवलेले हे आजोबा कुणाच्या तरी प्रतीक्षेत असल्यासारखे दिसत होते.दरम्यान, घरी मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. पारूबाई जाधव यांचे डोळे सतत दाराकडे लागलेले… “आता येतील… आता येतील…” अशी आशा, पण प्रत्येक क्षण निराशेत बदलत होता. चार-पाच दिवस उलटून गेले, तरी पतीचा काहीच पत्ता लागेना.
अखेर काळजीने व्याकुळ झालेल्या पारूबाई यांनी स्वतःच शोध घेण्याचा निर्णय घेतला.मंगळवारी (दि. ७) सकाळी त्या सोलापूर-पुणे पॅसेंजरने पुण्याकडे निघाल्या. मनात एकच ध्यास, “कुठेही असतील, पण माझे पती सापडलेच पाहिजेत…” पण नियतीने त्यांना फार दूर जाऊ दिले नाही... सोलापूर रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचारी मंगेश शिंदे यांनी पारूबाई यांना पाहताच ओळखले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांना विठ्ठल जाधव यांची माहिती होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पारूबाई यांना थांबवले आणि सांगितले,
“तुमचे पती इथेच आहेत… फलाट क्रमांक पाचवर…” -
हे ऐकताच पारूबाईंच्या डोळ्यांत आशेचा किरण चमकला. त्या क्षणी त्यांच्या पावलांना जणू पंख फुटले. फलाट क्रमांक पाचवर पोहोचल्यावर जे घडले, ते पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले. पाच दिवसांनी समोर उभा असलेला आपला जीवनसाथी पाहताच पारूबाई जाधव यांनी टाहो फोडला. विठ्ठल जाधव यांनीही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पत्नीला जवळ घेतले. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले.
तो क्षण शब्दात मावणारा नव्हता-
तो होता विरहाचा अंत…तो होता प्रेमाचा पुनर्जन्म…हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहताना सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि सफाई कामगारही भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारण त्या मिठीत फक्त दोन माणसे नव्हती, तर आयुष्यभराची साथ, आठवणी आणि न तुटणारा बंध होता. यानंतर मंगेश शिंदे यांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. काही वेळातच नातू लक्ष्मण बाबू गोचडे स्थानकावर दाखल झाला आणि आजोबा-आजींना पुन्हा प्रेमाच्या घरट्यात घेऊन गेला. ही घटना केवळ एका दांपत्याच्या पुनर्मिलापाची नाही. तर ती सांगून जाते, “वय काहीही असो, प्रेम कधीच संपत नाही… आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे..