सेंथिलकुमार चेक ओपनच्या अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्क्वॅशपटू वेलावन सेंथिलकुमारने ब्रानो येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित पीएसए चेक ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी त्याचा सामना अव्वल मानांकित ग्रेग लोबनशी होणार आहे.
ब्रनो येथे आयोजित 35000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकेमच्या पीएसए चेक ओपन स्पर्धेत भारतीय स्क्वॅशपटू वेलवन सेंथिलकुमारने आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ऑगस्टे डूसूर्डचा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर असलेला आणि जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेल्या भारतीय खेळाडूने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानी असलेल्या डूसूर्डला 11-7, 12-10, 11-1 अशा फरकाने पराभूत केले.
याआधी, उपांत्यपूर्व फेरीत त्याने आठव्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत 64 व्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या जेरेमियास अझानावर 11-3,11-8,11-7 असा विजय मिळवला होता. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर, दुसऱ्या फेरीत सेंथिलकुमारने ब्राझीलच्या दिएगो गोबीचा 11-4,11-7,11-2 असा पराभव केला होता. गेल्या महिन्यात जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या 28 वर्षीय भारतीय खेळाडूचा आता विजेतेपदासाठी सामना स्कॉटलंडच्या अव्वल मानांकित आणि क्रमवारीत 31 व्या स्थानी असलेल्या ग्रेग लोबनशी होईल.
