For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनय कुलकर्णींसह 17 दोषींना आज शिक्षा सुनावणार

11:15 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनय कुलकर्णींसह 17 दोषींना आज शिक्षा सुनावणार
Advertisement

योगीश गौडा हत्या प्रकरण : बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष केंद्रित

Advertisement

बेंगळूर : धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा हत्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णींसह 17 आरोपींना न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले होते. गुरुवारी शिक्षेच्या प्रमाणाविषयी युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार 17 रोजी शिक्षा सुनावण्यात येईल, असे सांगून सुनावणी पुढे ढकलली. गुरुवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाविषयी वाद-युक्तिवाद झाले. अपराधींना देखील बाजू मांडण्याची मुभा देण्यात आली. सीबीआयच्या वकिलांनी, 17 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. सीबीआयचे प्रतिनिधीत्व करणारे सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी, आम्ही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नाही. त्याऐवजी त्यांना जन्मठेपेची सुनावण्यात यावी, असे सांगितले.

योगीश गौडा यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हे दुर्मिळ प्रकरण आहे. सीबीआयने तपास केल्यानंतर हा कट उघडकीस आला. पोलीस अधिकारी आणि संपूर्ण यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला. न्यायव्यवस्थेची दिशाभूल झाल्याची बाब गांभीर्याने विचारात घेऊन कमाल शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. विनय कुलकर्णींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एम. एस. श्यामसुंदर म्हणाले, विनय कुलकर्णी तीन वेळा आमदार बनले आहेत. त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना तीन मुले आहेत. 3,500 हून अधिक गायी-म्हशी पाळल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. राजकीय कारणांमुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यांना कमीत कमी शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती केली.

Advertisement

न्यायाधीशांसमोर हजर झाल्यानंतर आमदार कुलकर्णी यांनी, मी 27 वर्षांपासून राजकारणात आहे. मी माझ्या आयुष्यात कोणावरही अन्याय केलेला नाही. राजकीय सुडापोटी मला या प्रकरणात अडकविण्यात आले. मला तीन मुले आहेत. ते लग्नाच्या वयाची झाली आहेत. मी तीन वेळा आमदार बनलो आहे. दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढविली. एकदा मंत्रिपदही भूषविले आहे. या प्रकरणामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मला सूट द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी शुक्रवार 17 रोजी दोषींना शिक्षा सुनावण्यात येईल, असे जाहीर केले.

विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली

योगीश गौडा हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांच्यासह राज्यातील विविध न्यायालयांतील 114 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 1 जूनपासून त्यांना बदली झालेल्या ठिकाणचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.