सेन्सेक्स 1 लाखाचा टप्पा ओलांडेल : मार्क मोबीयस
नवी दिल्ली :
सध्याच्या भारतीय शेअर बाजाराची एकंदर कामगिरी पाहता या डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक 1 लाख पर्यंतची यशस्वी मजल मारेल असा अंदाज अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार मार्क मोबीयस यांनी वर्तवला आहे.
ते म्हणाले की, भारतीय शेअर बाजाराची वाटचाल दिमाखदार सुरु आहे. चीनमधील वाटचालही भारतासाठी फलदायी राहणार आहे. मोबीयस कॅपिटल पार्टनर्स एलएलपीचे संस्थापक मार्क मोबीयस म्हणाले, सेबीकडून अलीकडेच नियमावली केली असून त्याचा सकारात्मक परिणाम बाजारात दिसतोय. अलीकडेच चीनने व्यवसायवाढीसाठी पॅकेज जाहीर केले आहे, त्यामुळे चीनमधील बाजारही उंचीवर दिसणार आहे. त्यांच्या मते भारतीय भांडवली बाजारात गती येण्यासाठी रिअल इस्टेट आणि कमोडीटी ही क्षेत्रे महत्त्वाची ठरणार आहेत. यासोबत धातू, ऑटोमोटीव्ह व पायाभूत सुविधांची क्षेत्रेही चांगली कामगिरी नोंदवतील. फार्मा, वित्त क्षेत्रेही उत्तम कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलीकडेच सेमीकंडक्टर निर्मितीत भारताकडून सातत्याने प्रयत्न होत असून विदेशी कंपन्या भारतात रस घेत असून याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसू शकतो, असेही शेवटी ते म्हणाले.