सेन्सेक्सची 1,000 अंकांवर उसळी
बाजाराच्या तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्यातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. जागतिक पातळीवरील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ सकारात्मक राहिली आहे. शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स 81,354 वर उघडला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 1046.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.29 टक्क्यांच्या वाढीसह 82,408.17 वर बंद झाला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 319.15 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 25,112.40वर बंद झाला आहे.
बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.20 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.55 टक्के वाढला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मागील सत्रात सुमारे 443 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 447 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामुळे एका सत्रात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रुपयांचा नफा झाला.
शुक्रवारी मारुती सुझुकी इंडिया (0.02 टक्क्यांनी घसरला) वगळता सर्व सेन्सेक्समधील समभाग वधारले. यामध्ये भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग सर्वाधिक वधारले, ज्यांनी 3.27 टक्के ते 1.97 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. जियो फायनॅन्शीयल, दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, महिंद्रा, दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज, सिप्ला, सनफार्मा, लार्सन टुब्रो यांचे समभाग तेजीत होते. बजाज ऑटो घसरणीत होता.
या क्षेत्रांमध्ये राहिली चमक
एनएसईच्या सर्व क्षेत्रांमध्ये तेजी राहिली आहे. यापैकी, निफ्टी रिअल्टी इंडेक्स 2.11टक्केच्या वाढीसह सर्वाधिक वधारला. एनएसईवरील तिन्ही बँकिंग निर्देशांक -बँक निफ्टी, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक-देखील 1 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. याशिवाय, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, मेटल, ऑटो आणि हेल्थकेअर निर्देशांकांमध्येही 1 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली.