आरबीआयच्या निर्णयाने सेन्सेक्स झेपावला
रेपोदरात कपात केल्याचा परिणाम : बँक निफ्टी उच्चांकावर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सलग आणि तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात वाढ नोंदवली आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दर कमी केल्याच्या निर्णयामुळे शेअर बाजाराला चालना मिळाली आहे. आरबीआयने रेपो दरात 0.50 टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक विश्लेषकांनी व्याजदरात 0.25 टक्के कपात होण्याची शक्यता वर्तवली होती.
बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी 81,434.24 अंकांवर पोहोचत काहीसा दबाव घेतच तो घसरणीसोबत उघडला. आरबीआयच्या रेपो दरावरील निर्णय जाहीर होईपर्यंत बाजार घसरणीतच स्थिर होता. मात्र अंतिमक्षणी सेन्सेक्स 746.95 अंकांसोबत 0.92 टक्क्यांनी वाढून 82,188.99 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 252.15 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,003.05 वर बंद झाला आहे.
मीडिया निर्देशांक वगळता, इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीत होते. निफ्टी रिअॅलिटी निर्देशांक 4.68 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानावर राहिला. यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, ओबेरॉय रिअॅलिटी, डीएलएफ, प्रेस्टिज, शोभा आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स यांनी तेजी राखली होती. इतर बँक, मेटल, ऑटो, वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि आयटी यांनी 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
निफ्टी बँक विक्रमावर
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने शुक्रवारी निफ्टी बँकेने दिवसभरात विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढून 56,428.90 या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, पीएनबी, कोटक महिंद्रा बँकमध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. आशियाई बाजारपेठेत तेजी दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक 0.31 टक्क्यांनी वाढला. कोस्पी 1.49 टक्के आणि एएसएक्स-200 मध्ये 0.03 टक्के वाढ झाली.