‘आयटी’च्या कामगिरीने सेन्सेक्सची 791 अंकांवर उसळी
बाजारात पुन्हा तेजीचा माहोल परतला : बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातही सकारात्मक वारे
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी आयटी, बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातील सकारात्मक कामगिरीमुळे तेजीचे वारे पुन्हा परतल्याचे दिसून आले. दरम्यान या क्षेत्रातील तेजीमुळे सेन्सेक्सने 791 अंकांवर उसळी घेतली, तसेच निफ्टीही वधारुन बंद झाला.
वृत्तसंस्था, मुंबई
वरील क्षेत्रातील शेअर्समधील खरेदीच्या जोरावर बुधवारी शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 790.54 अंकांनी वाढून 76,991.22 वर बंद झाला. त्यावेळी, एनएसई निफ्टी 197.55 अंकांनी तेजी प्राप्त करुन 24,021.65 वर बंद झाला.
निफ्टीमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, अदानी एंटरप्रायझेस आणि ट्रेंट हे सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते. व्यापक बाजारातही सकारात्मक कल दिसून आला. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप अनुक्रमे 0.10 टक्के आणि 0.39 टक्क्यांनी वाढून बंद झाले.
‘या’ क्षेत्रांची चमक
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी आयटी आणि निफ्टी रियल्टी 2 टक्क्यांहून अधिक वाढले. याशिवाय, निफ्टी बँक आणि निफ्टी खासगी बँक यांच्या निर्देशांकांनीही चांगली कामगिरी केली. त्याचवेळी, ऑटो आणि मेटल स्टॉक्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली. निफ्टीमधील सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब, अदानी एंटरप्रायझेस, ट्रेंट, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होता. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली.
व्यापार कराराची आशा
अमेरिकेच्या उपपरराष्ट्र सचिव बेथनी पौलॉस मॉरिसन यांनी सांगितले की, अमेरिका आणि भारत एका महत्त्वाच्या द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या अगदी जवळ आहेत. त्यांच्या मते, या करारामुळे अमेरिकन वस्तूंना भारतातील 14 लाख ग्राहकांच्या बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे आणि हा करार दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल अशा परस्पर अटींवर आधारित असेल. त्यांच्या विधानावरून असे सूचित होते की, वाटाघाटींमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे आणि लवकरच करार होऊ शकतो. यावरही बाजाराची नवी दिशा अवलंबून राहणार आहे.
जागतिक बाजारात तेजी
दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 10 टक्क्यांनी घसरल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली, कारण जोरदार तेजीनंतर शेअर्सचे मूल्य जास्त झाल्याच्या चिंतेने गुंतवणूकदारांना चिंता वाटू लागली होती.
