आयटी’च्या तेजीने सेन्सेक्स मजबूत
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात उत्साह: इराण-इस्रायल युद्धबंदीचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्याची भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी पडझडीसोबत झाली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये इराण-इस्रायल युद्धबंदी दरम्यान बुधवारी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात तेजीसह बंद झाला.
इन्फोसिसच्या नेतृत्वाखालील आयटी शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजाराला चालना मिळाली. एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्समधील निर्देशांकांमध्येही वाढ झाली.
मुख्य कंपनीच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 700.40 अंकांच्या मजबूत कामगिरीने निर्देशांक 82,755.51 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 200.40 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 25,244.75 वर बंद झाला आहे. बुधवारी सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा ग्रुपचा शेअर टायटन सर्वाधिक वाढणारा होता. तो 3.75 टक्क्यांनी वाढला. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, टीसीएस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट यांनी सर्वाधिक वाढ नोंदवली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ
व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.38 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.56 टक्क्यांनी वाढला. इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स सुमारे 3 टक्क्यांनी घसरला, जो बाजारातील स्थिरता दर्शवितो. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी आयटी इंडेक्स 1.22 टक्के आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारुन बंद झाला.
जागतिक संकेत
आशियाई बाजारपेठेत सुरुवातीच्या वाढीनंतर, बहुतेक निर्देशांक सपाट होते. गुंतवणूकदारांना आशा आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी होऊ शकते, ज्यामुळे भू-राजकीय तणावात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
जपानचा निक्केई 0.073 टक्क्यांनी वधारला, तर टॉपिक्स 0.1 टक्क्यांनी घसरला. ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी देखील थोड्याशा घसरणीसह स्थिर व्यवहार करत आहेत. दरम्यान, यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की, सध्याच्या महागाई आणि टॅरिफच्या अनिश्चिततेमुळे व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी फेडरल वाट पाहण्याच्या तत्त्वावर राहील.