सेन्सेक्स 813 अंकांनी कोसळला, निफ्टीही 203 अंकांनी नुकसानीत, कच्चे तेल शंभरी पार
अमेरिका आणि इराण यांच्यात नव्याने वातावरण पुन्हा तापल्याने भारतीय शेअर बाजारात बुधवारच्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात दबाव दिसून आला. कच्च्या तेलाच्या दराने शंभरी गाठली असून बुधवारी गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 813 अंकांनी कोसळून 74,764 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 203 अंकांनी घसरून 23,431 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 482 अंकांनी घसरत 56295 च्या स्तरावर बंद होताना दिसला. सर्वाधिक दबाव हा आयटी निर्देशांकावर पाहायला मिळाला. बुधवारच्या सत्रात आयटी निर्देशांक 969 अंकांनी कोसळत 28913 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेने इराणच्या तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर 20 क्षेपणास्त्रs डागल्याचे वृत्त आहे. या बातमीने सर्वत्र घबराट पसरली. याचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही दिसून आला. सोबत ब्रेंट व्रुड तेलाने तर शंभरी पार केल्याने गुंतवणूकदार सावध झालेले पहायला मिळाले. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला आणि निफ्टी 23,450 च्या खाली जाऊन दिवसभरातील नीचांकी पातळीवर बंद झाला. व्यापक स्तरावरही विक्रीचा दबाव जोरदार होता. दुसरीकडे निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्ये अर्ध्या टक्क्याची घसरण झाली.
मेटल वगळता इतर बरेचसे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. दुसरीकडे पाहता मेटल शेअर्सनी बाजाराला आधार दिला. मेटल निर्देशांकांत 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. निफ्टी रियल्टी 2 टक्क्यांहून अधिक, निफ्टी प्रायव्हेट बँक जवळपास 1 टक्क्याने आणि निफ्टी पीएसयू बँक अर्ध्या टक्क्याने घसरला. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल 8 सप्टेंबर, 2026 रोजी 4,87,64,321.47 कोटी रुपये होते. 9 सप्टेंबर 2026 रोजी ते घसरून 4,84,17,376.56 कोटींवर आले. गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,46,944.91 कोटींची घट झाली आहे.
समभागांची कामगिरी
सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 30 शेअर्सपैकी फक्त 6समभाग तेजीत असताना दिसले. अदानी पोर्ट्स, टाटा स्टील आणि ट्रेंट सर्वाधिक वाढीसह बंद झाले. तर एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. अदानी एंटरप्रायझेस, मॅक्स हेल्थकेअर, कोल इंडिया, हिंडाल्को, एमआरपीएल, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, टोरेंट पॉवर, अपोलो टायर्स हे समभाग वधारत बंद झाले.