इस्रायल-इराणच्या युद्ध स्थितीमुळे सेन्सेक्स कोसळला
सेन्सेक्स 1769 अंकांनी नुकसानीत : गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा फटका : निफ्टी 2 टक्क्यांनी प्रभावीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात मोठ्या घसरणीचा प्रवास राहिला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक या सारख्या दिग्गज कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. बाजारात इतकी मोठी घसरण येण्यास जागतिक पातळीवरील इराण व इस्रायल यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे जागतिक बाजारांसह अन्य आर्थिक क्षेत्रात दबावाचे ढग निर्माण झाले आहेत. याचा फटका हा भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मध्य पूर्वमधील वाढता तणाव आणि निर्देशांक डेरिव्हेटिव्ह यांच्या नवीन नियम लागू होणार असल्याच्या स्थितीमुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे विदेशी फंड काढून घेतला आहे व कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीत राहिले आहेत.
शेअर बाजारात नकारात्मक कल राहिल्याने चौथ्या दिवशी घसरणीसोबत बाजार राहिला. यामध्ये सेन्सेक्स तब्बल 1769.19 अंकांनी कोसळून निर्देशांक 82,497.10 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 546.10 अंकांच्या नुकसानीत सोबत निर्देशांक 25,250.10 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 29 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, टाटा मोटर्स, बजाज फायानान्स, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, टायटन, अदानी पोर्ट आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एकमात्र जेएसडब्लू स्टीलचे समभाग वधारले आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील बाजारांमध्ये हाँगकाँग प्रभावीत राहिला आहे. तसेच टोकीओ हा वधारला आहे. तसेच चीनमधील बाजार सुट्टीमुळे बंद होते. युरोपीयन बाजारांमध्ये सर्वाधिक घसरण राहिली आहे.
गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीं बुडाले
गुरुवारच्या सत्रात मोठी घसरण राहिल्याने गुंतवणूकदारांना तब्बल 9.7 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.