अंतिम सत्रात सेन्सेक्स-निफ्टीत तेजीची झुळूक
तेल आणि संरक्षण क्षेत्रांची सकारात्मक कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. मागील सत्रांमध्ये प्राप्त केलेल्या घरसणीला पूर्णविराम देत शुक्रवारी तेजीची झुळूक दोन्ही निर्देशांकांमध्ये राहिली आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 193.42 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 83,432.89 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 25,461.00 वर बंद झाला आहे. दरम्यान या वेळी, स्मॉलकॅप आणि मिडपॅप निर्देशांकांमध्येही वाढ दिसून आली. मिडकॅप निर्देशांक 0.23 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.17 टक्के वाढले.
सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली आहे. निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत, बजाज फायनान्सचा शेअर राहिला, ज्याने 1.67 टक्के वाढ प्राप्त केली. तर इन्फोसिस 1.36 टक्के वाढला, डॉ. रे•ाrज लॅब्ज 1.25, आयसीआयसीआय बँक 1.19, विप्रो 1.13 टक्के वधारले आहेत. निफ्टीत टाटा स्टीलमध्ये 1.75, आयशर मोटर्समध्ये 1.53, टेक महिंद्रामध्ये 1 टक्के घसरण, मारुती सुझुकीत 0.84 टक्के घसरण झाली.
क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी
बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक तेजीसोबत बंद झाले, परंतु असे असूनही काही निर्देशांक घसरुन बंद झाले आहेत. निफ्टी कॅपिटल निर्देशांक तोट्यात होता, जो 2.55 टक्क्यांनी घसरला. यानंतर, निफ्टी इंडिया कंझ्युमरमध्ये 0.49 टक्के घसरण झाली, तर निफ्टी धातूमध्ये 0.45 टक्के घसरण झाली. सर्वात जास्त वाढ निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये झाली, जी 1.05 टक्के वाढली. निफ्टी डिफेन्समध्ये 0.95 टक्के वाढ झाली.