अंतिम सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
बीपीसीएलचे समभाग 10 टक्क्यांनी मजबूत : सेन्सेक्स 440 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते. मागील काही दोन दिवसांमध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेवर आणलेले निर्बंध आणि केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या घडामोडींमध्ये भारतीय बाजारात दबाव व घसरणीचा कल राहिला होता. परंतु गुरुवारी सादर झालेला अर्थसंकल्प व पेटीएमवरील संकट हे कायमचे नसल्याचे संकेत यामुळे भारतीय बाजार काहीसा सावरत पुन्हा तेजीसह अंतिम सत्रात बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 440.33 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,085.63 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 156.35 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 21,853.80 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडींमत विदेशातील बाजारात तेजीचा कल राहिला होता. याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. यामध्ये बीपीसीएलचे समभाग हे जवळपास 10 टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग काहीसे सावरले आहेत. तसेच दुसऱ्या कंपन्यांची स्थिती पाहिल्यास बँकिंगचे समभाग प्रभावीत राहिले होते.
निफ्टीत एफएमसीजी, फायनाशिअल सर्व्हिसेससह बँक निफ्टी हे नुकसानीत राहिले आहेत. तर बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी, निफ्टी वाहन आणि निफ्टी फार्मा यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते.
भारतीय बाजारात कार्यरत राहिलेल्या समभागांमध्ये प्रामुख्याने आयशर मोर्ट्स, अॅक्सिस बँक, एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि आयटीसी यांचे समभाग हे नकारात्मक राहिले होते. तर बीपीसीएल, पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, टाटा कझ्युमर आणि टीसीएस यांचे समभाग वधारले होते.
घसरणीची नेंद करणाऱ्या कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांमध्ये सातचे समभाग हे नकारात्मक राहिले. तर तीन समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या समभागांमध्ये स्पाइसजेट, गल्फ ऑईल, इंडियन ऑईल पीएनबी, सर्वो टेक, इरेडा, दक्षिण इंडियन बँक, गेल, हजूर मल्टी प्रोजेक्ट, बंधन बँक वधारले होते. तर डीपी वायर्स, आयटीसी, बीसीएल इंडस्ट्रीज, कझारीया सेरेमिक्स आणि पेटीएम यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.