अंतिम सत्रात सेन्सेक्स -निफ्टी तेजीत
आयटी आणि बँकिंग यांच्या समभागामध्ये मजबूत स्थिती
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. यावेळी दिवसभरातील कामगिरीत आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमधील तेजीमुळे भारतीय बाजार शुक्रवारी वधारुन बंद झाला आहे
मात्र दुपारनंतर औषध आणि धातूच्या समभागात नफा वसुलीचा कल राहिला होता. दरम्यान जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती राहिल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 178.58 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,026.15 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 52.20 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 21,710.80 वर बंद झाला. दरम्यान बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 0.19 टक्क्यांनी वधारला तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.61 टक्क्यांनी मजबूत राहिला आहे.
मागील सत्रातील कामगिरीचा सकारात्मक कल हा अंतिम सत्रातही कायम राहिल्याचे दिसून आले. काहीकाळ बाजारात चढउताराचा कल राहिला होता. मात्र बाजाराने आपली तेजी कायम ठेवली होती. दिग्गज कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स, टीसीएस, लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग तेजीत राहिले होते. तर ब्रिटानिया, युपीएल, नेस्ले आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.
देशातील बाजारात निफ्टीमध्ये चालू सप्ताहात 21 अंकांची घसरण राहिली आहे. तर आठवड्याचा चढता आलेख आणि घसरण असा मिश्र काळ राहिला आहे. भारतीय शेअर बाजारात वर्षातील 2024 च्या पहिल्या आठवड्यात 1 जानेवारी रोजी निफ्टीने आपला नवीन विक्रम करत 21834 वर राहिला होता.
आगामी काळात भारतीय बाजाराचा प्रवास हा जागतिक व देशातील काही राजकीय व आर्थिक घडामोडींवर निश्चत होणार आहे. कारण येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळामधील भारतीय बाजाराची दिशा स्पष्ट होणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणुकीची रचना नव्याने करत प्रवास करावा लागणार असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.