नफा वसुलीमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण
धातू, वाहन आणि आयटी क्षेत्रांचे निर्देशांक नुकसानीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक यांची मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. यामध्ये नफा वसुलीच्या कारणास्तव दबावाची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे मागील काही सत्रांमध्ये प्राप्त केलेला 80 हजारांचा टप्पा नुकसानीसोबत बंद झाला आहे.
बुधवारच्या सत्रात मुख्य क्षेत्रांपैकी धातू, वाहन आणि आयटी क्षेत्रांमधील घसरणीचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. यासह अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याच्या निर्णयामधील अनिश्चितता यामुळे बाजारातील कल बदलला आहे.
दिग्गज 30 कंपन्यांच्या बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 426.87 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 79,924.77 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 108.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 24,324.45 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 10 समभाग वधारुन बंद झाले. एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग हे पहिल्या पाचमध्ये अव्वल तेजीत राहिले आहेत. यासह सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे नफा कमाईत राहिले.
अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा स्टील, टीसीएस, एचसीएल टेक आणि स्टेट बँक यांचे समभाग हे सर्वाधिक प्रभावीत राहिले. यासह टाटा मोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, आयटीसी, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक स्थिती
आशियातील बाजारांमध्ये शांघाय आणि हाँगकाँग खालच्या पातळीवर राहिले. तर सियोल आणि टोकीओ हे उच्चांकी पातळीवर कार्यरत राहिले.