For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्स निर्देशांकाची 73,000 वर झेप

06:13 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्स निर्देशांकाची 73 000 वर झेप
Advertisement

एचडीएफसीसह अन्य बँकिंग समभागांमध्ये मजबूत स्थिती  : निफ्टी 74 अंकांनी वधारला

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात मागील काही दिवसांपासून तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय बाजारात बीएसई सेन्सेक्स तब्बल 73,000 च्या टप्प्यावर झेपावल्याचे दिसून आले. यासोबतच एनएसई निफ्टीही 74 अंकांच्या मजबूतीसह बंद झाला होता.

Advertisement

मुख्य कंपन्यांच्या स्थितीचा आढावा घेतल्यास यात एचडीएफसी बँकेचे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिले होते. यासह अन्य बँकिंग क्षेत्रातील समभागांनी आपली मजबूत कामगिरी केल्याने भारतीय बाजाराला फायदा झाल्याची नेंद करण्यात आली.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 349.24 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 73,057.40 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 74.70 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक हा 22,196.95 वर बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्सने नवा प्रवास करत तब्बल 73,000 वर मजल मारली आहे. याचा फायदा हा आगामी काळातही होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

प्रारंभीच्या स्थितीतून सावरला

भारतीय बाजार हा मंगळवारी ट्रेडिंगच्या दरम्यान सुरुवातीच्या तासाभरात 0.2 टक्क्यांनी घसरला होता, मात्र लगेच सावरत बाजाराने सलगची सहावी तेजी प्राप्त केली आहे. मागील 10 सप्ताहामधील ही सर्वात मोठी झेप असल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग हे सर्वाधिक 4.16 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यासोबतच एचडीएफसी बँक 2.5 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारुन बंद झाला. अॅक्सिस बँक, कोटक बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँकेसह अन्य 18 कंपन्यांचे समभाग हे तेजीत राहिले होते.

अन्य कंपन्यांमध्ये मात्र टीसीएसचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले. यासह बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएससह 12 अन्य कंपन्यांची कामगिरी ही घसरणीसह बंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.