मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स 204 अंकांनी मजबूत
अदनी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी : सेन्सेक्स 66 हजारांच्या घरात
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील सोमवारी गुरुनानक यांच्या जयंतीनिमत्ती शेअर बाजाराला सुट्टी होती. त्यामुळे मंगळवारचे सत्र हे आठवड्यातील पहिले सत्र ठरले आहे. अदानी समूहातील कंपन्यांमधील समभागांच्या तेजीमुळे व कच्च्या तेलाच्या किंमतींमधील घसरणीमुळे ऊर्जा कंपन्यांचे समभाग बाजारात वधारले होते. याचा सकारात्मक लाभ हा भारतीय शेअर बाजाराला झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 204.16 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.31 टक्क्यांसोबत 66,174.20 वर बंद झाला आहे. याच दरम्यान सेन्सेक्स 66,265.20 वर कार्यरत राहिला होता. सेन्सेक्समधील 23 कंपन्यांचे समभाग तेजीत तर सात समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 95.00 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 19,889.70 वर बंद झाला आहे. 20 सप्टेंबर 2023 नंतर निफ्टीने एक उच्चांकी पातळी प्राप्त केली असून 39 कंपन्यांचे समभाग तेजीत तर 11 समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.
मंगळवारच्या सत्रात टाटा मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारले आहेत. यावेळी टाटा मोर्ट्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 3.56 टक्क्यांनी मजबूत राहिल्याचे दिसून आले. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले. अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग हे 2.6 टक्के ते 20 टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. तर सर्वाधिक तेजीत अदानी एंटरप्राईजेसचे समभाग राहिले.
या कारणांमुळे तेजीचे वातावरण
विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे व कच्च्या तेलाच्या किंमतीत नरमाईचा कल राहिल्याने भारतीय शेअरबाजारात तेजी राहिली आहे. देशातील बाजारात मागील दोन ट्रेडिंगमध्ये घसरणीचा कल राहिला होता. परंतु याला पूर्णविराम दिला आहे. बाजारातील अंतिम क्षणी वाहन क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे बाजाराला मजबुती प्राप्त झाल्याचे दिसून आले. यासह विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये शुक्रवारच्या सत्रात 2625.21 कोटी रुपयांच्या इक्विटीची खरेदी करण्यात आली आहे.