सेन्सेक्स 1,400 अंकांनी भक्कम स्थितीत
जागतिक सकारात्मक वातावरणाचा लाभ : निफ्टीची झेप 23,700 वर
मुंबई :
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय शेअर बाजार जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे भक्कम स्थितीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंम्प यांच्या मेक्सिको आणि कॅनडा याच्यावरील टॅरिफ शुल्क 30 दिवसांसाठी मागे घेण्याच्या निर्णयामुळे सेन्सेक्सने तब्बल 1400 अंकांची उसळी घेतली तर दुसऱ्या बाजूला निफ्टीही मजबूत कामगिरी करत बंद झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1397.07 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 1.81 टक्क्यांसोबत वधारुन 78,583.81 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 378.20 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,739.25 वर बंद झाला आहे. या अगोदरच्या ट्रेंडिग दरम्यान सेन्सेक्स 319.22 अंकांनी प्रभावीत झाला होता. तर निफ्टीही 121.10 अंकांनी नुकसानीत राहिले होते.
मुख्य कंपन्यांमध्ये प्रामुख्याने लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे सर्वाधिक 5 टक्क्यांनी वधारुन बंद झाले होते. यासह अदानी पोर्टस्, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एशिय पेन्ट्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, सनफार्मा, इन्फोसिस यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
‘या’ कारणांमुळे बाजारात चमक : 1. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचा मॅक्सिको आणि कॅनडा प्रस्तावावर टॅरिफ शुल्क 30 दिवसांसाठी थांबविल्याचा परिणाम
- वरील घटनेमुळे जागतिक बाजारात उत्साहाची स्थिती
- एनर्जी, बँक आणि धातू क्षेत्रातील कामगिरीचा बाजाराला फायदा
गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फायदा
जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत राहिले. यामुळे बीएसईमधील बाजारमूल्य 5 लाख कोटी रुपयांनी वधारुन 425,04,589 कोटी रुपये राहिले आहे.
रुपया मजबूत
भारतीय रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 87.0675 वर बंद झाला. जो मागील सत्रात 87.1850 होता.