अंतिम सत्रात सेन्सेक्स 1,331 अंकांनी मजबूत
सेन्सेक्स पुन्हा 80 हजारांच्यावर : आयटी व बँकिंग क्षेत्रात चमक
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात पुन्हा मजबूत कामगिरी दिसून आली. यामध्ये आयटी व बँकिंग या क्षेत्रातील समभागांच्या भक्कम कामगिरीच्या मदतीने सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक पुन्हा नव्या उंचीवर पोहोचले आहेत.
शुक्रवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक भक्कम तेजीसह बंद झाले आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात असणारे दबावाचे वातावरण काहीसे निवळण्यास प्रारंभ झाल्याचे संकेत आहेत. कारण आगामी काळात सणासुदीचे दिवस सुरु होणार असून या काळात बाजारांपेठांमध्ये विविध प्रकारच्या उलाढालीस प्रारंभ होणार असल्याने याचा लाभ गुंतवणूकदारांना होणार असल्याचेही संकेत व्यक्त होत आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1,330.96 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 1.68 टक्क्यांच्या तेजीसह 80,436.84 वर बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 397.40 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 1.65 टक्क्यांची वाढ नोंदवत 24,541.15 वर बंद झाला आहे.
आयटी व बँकिंगमध्ये चमक
सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 29 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये टेक महिंद्रा, टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये तेजीत राहिले आहेत. यासह इन्फोसिस, भारती एअरटेल, स्टेट बँक, टायटन, आयटीसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, कोटक बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स आणि बजाज फायनान्स यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्माचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत.