सेन्सेक्स सपाट, निफ्टी तेजीसह बंद
सेन्सेक्स 19 अंकांनी घसरणीत तर निफ्टी 75 अंकांनी तेजीत, मेटल, बँकांचे समभाग फॉर्मात
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात संमिश्र चित्र दिसून आले. मेटल, बँकिंग निर्देशांकांनी चमकदार कामगिरी केली खरी पण दुसरीकडे आयटी व एफएमसीजी क्षेत्रांनी बाजारावर दबाव निर्माण केला. रुपया मजबूत होताना दिसला.
वृत्तसंस्था, मुंबई
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले. दोन्ही प्रमुख निर्देशांक वेगवेगळ्या दिशांना बंद झाले. मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 19 अंकांनी घसरून 74,294 वर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 75 अंकांच्या वाढीसोबत 23,346 वर बंद झाला होता. निफ्टीने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून चांगली सुधारणा दर्शवली.
दिवसभरातील चढ-उतारानंतर, मेटल, मीडिया आणि बँकिंग क्षेत्रातील वाढीमुळे निफ्टी निर्देशांक वधारत कार्यरत होता तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातल्या समभागांनी सेन्सेक्सवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्यवहार बंद होताना शुक्रवारी बाजारात क्षेत्रीय स्तरावर लक्षणीय हालचाल दिसून आली, ज्यात काही क्षेत्रांनी बाजाराला आधार दिला तर इतरांनी निर्देशांकावर दबाव आणला. शुक्रवारी व्यवहारात धातू आणि माध्यम क्षेत्रांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये लक्षणीय 1.51 टक्के इतकी वाढ होऊन तो 13,053 वर बंद झाला. धातू कंपन्यांच्या शेअर्समधील या खरेदीने निफ्टीला वर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निफ्टी मीडिया इंडेक्समध्येही 1.30 टक्के इतकी वाढ झाली. माध्यम कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीत रस दाखवला होता. एकंदर बाजारात पाहता मिड व स्मॉलकॅप निर्देशांक 1 ते 1.7 टक्के इतका वाढला होता. रियल्टी निर्देशांकही चांगली तेजी अनुभवत होता.निफ्टीत 26 समभाग हे तेजीत तर 24 घसरणीत होते. निर्देशांकात अदानी पोर्टस् व अदानी एंटरप्रायझेस हे समभाग सर्वाधिक तेजीत होते. जे 3 ते 5 टक्के वाढीसह बंद झाले. टीसीएस व टाटा मोटर्स पीव्ही यांचे समभाग प्रत्येकी 3 टक्के इतके घसरलेले होते. यांच्यासोबत तेजीत दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, इंडिगो, एचडीएफसी बँक, ट्रेंट, इंडिगो, ओएनजीसी, इटर्नल, ग्रासिम यांचेही समभाग दिसून आले.