बाजारात सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला
गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान
वृत्तसंस्था/ मुंबई
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्याच व्यवहाराच्यादिवशी भारतीय शेअर बाजार 900 पेक्षा जास्त अंकांनी सोमवारी घसरणीत राहिला होता. चौफेर समभागांची विक्री होण्यासोबतच गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. अमेरिकेत मंगळवारी होणारी निवडणूक त्याचप्रमाणे जोरदार विक्रीच्या दबावामध्ये शेअर बाजार सोमवारी घसरणीत राहिला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 942 अंकांनी म्हणजेच 1.18 टक्के कोसळत 78782 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 309 अंकांनी म्हणजेच 1.27 टक्के घसरत 23996च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांक गेल्या पाच आठवड्यात जवळपास 7700 अंकांनी मोठ्या प्रमाणात कोसळलेला आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्के इतके घसरणीत होते. मात्र शेवटच्या क्षणी घसरण कमी होण्यास मदत झाली. याआधी पाहता 27 सप्टेंबर 2024 रोजी सेन्सेक्स निर्देशांकाने 85978चा विक्रमी स्तर गाठला होता. सोमवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले तर 6 कंपन्यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग सर्वाधिक 2.36 टक्के घसरत 2884 रुपयांवर बंद झाले.
दुसरीकडे टेक महिंद्राचे समभाग मात्र 2.17 टक्के वाढत 1638 रुपयांवर बंद झाले. एसबीआयचे समभाग 1.6 टक्के वाढत 829 रुपये, एचसीएल टेकचे समभाग 0.32 टक्के वाढत 1763 रुपयांवर बंद झाले. यासोबतच इन्फोसिस 0.16 टक्के आणि इंडसइंड बँकेचे समभाग 0.13 टक्के तेजीसोबत व्यवहार करत होते. घसरणीमध्ये पाहता अदानी समूहातील अदानी पोर्टस्चे समभाग 3.24 टक्के घसरत 1349 रुपयांवर बंद झाले.