अंतिम सत्रात सेन्सेक्स 1017 अंकांनी कोसळला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी निफ्टी आणि सेन्सेक्स यांचे निर्देशांक घसरण नोंदवत बंद झाले आहेत. या मोठ्या घसरणीच्या प्रभावामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बीएसई सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात आणि एनएसई निर्देशांक सलग तिसऱ्यांदा प्रभावीत होत बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1017.23 अंकांनी कोसळून निर्देशांक 1.24 टक्क्यांनी प्रभावीत होत 81,183.93 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 292.95 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,852.15 वर बंद झाला आहे.
चालू आठवड्यातील अंतिम सत्रातील कामगिरीत एक दिवसीय भारतीय शेअर बाजाराने तीन महिन्यांतील सर्वात नकारात्मक कामगिरी केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार समभागांची विक्री केली. तसेच जागतिक पातळीवरील नकारात्मक कल व ताज्या विदेशी फंडाची झालेली विक्री यामुळे भारतीय बाजाराला जोरदार फटका बसला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात 1 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण राहिली. बाजारातील अभ्यासकांच्या मतानुसार अमेरिकत आर्थिक काळजीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अमेरिकेत व्याजदर कपात होण्याच्या शक्यता धुसर होत असल्याने याचा परिणाम हा बाजारातील स्थितीवर होत असल्याचे दिसून येत आहे.
बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य बाजार बंद झाल्यानंतर 460.59 लाख कोटी रुपयांवर राहिल्याचे दिसून आले. जे अगोदरच्या दिवशी जवळपास 5.5 लाख कोटी रुपयांनी घसरले होते. सेन्सेक्समध्ये फक्त 4 समभाग वधारले आहेत. तर निफ्टीत 8 समभाग तेजीत राहिले होते. सर्वाधिक तेजीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग तेजीत राहिले. तसेच एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग वधारले.