सेन्सेक्स घसरणीत, निफ्टी मात्र तेजीत
आयटी आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये जोरदार नफावसुलीचा बाजारात प्रभाव
मुंबई
भारतीय भांडवली बाजारात बुधवारी तिसऱ्या सत्रात आयटी आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांच्या नफा वसुलीच्या परिणामामुळे बीएसई सेन्सेक्समध्ये बुधवारी घसरण दिसून आली आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा मात्र तेजीसह मजबूत राहिल्याचे दिसून आले.
बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सची सुरुवात होताना, तेजीसह झाली होती, मात्र अंतिम क्षणी बाजारात पडझड झाल्याची नोंद केली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 34.09 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,152.00 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 1.10 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 21,930.50 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीत बुधवारी एस अॅण्ड पी सेन्सेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. स्टेट बँकेचा समभाग मागील 52 आठवड्यांचा विक्रम मोडीत काढत इंट्रा डेच्या दरम्यान 677.50 च्या पातळीवर पोहोचला आहे. यासोबतच बँकेचे बाजारमूल्य अधिकचे मजबूत झाले.
दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा मोर्ट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, विप्रो, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले.
आंतराष्ट्रीय घडामोडी :
आशियातील बाजारांमध्ये सियोल आणि चीनचे शेअर बाजार वधारुन बंद झाले आहेत. तर टोकीयो आणि हाँगकाँगचे समभाग हे मात्र प्रभावीत राहिले आहेत. युरोपीयन बाजारात अधिकतर घसरण राहिली.
बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 1.48 टक्क्यांनी वधारले, स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान निफ्टीमध्ये आयटी वगळता सर्व क्षेत्रांची झेप ही 3.49 टक्क्यांनी तेजीत राहिली होती.