सेन्सेक्स घसरणीत, निफ्टी अंशतः वाढीसह बंद
रिलायन्स इंडस्ट्रिज नुकसानीत, सेन्सेक्स 33 अंकांसह घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअरबाजारात चढउतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स नुकसानीसह तर निफ्टी निर्देशांक काहीशी तेजी दर्शवून बंद झाला. रिलायन्सचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 33 अंकांच्या घसरणीसह 62,834 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 5 अंकांनी वधारून 18,700 अंकांवर बंद झाला. निफ्टी धातू आणि निफ्टी सार्वजनिक बँकांचा निर्देशांक जवळपास 1.2 टक्के इतका वाढला होता. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक मात्र घसरणीत राहिले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि इन्फोसिसचे समभाग, डॉ. रेड्डीज लॅब्ज, ऍक्सिस बँक, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल्स, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, ब्रिटानिया यांचे समभाग घसरणीत राहिले होते. टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 3 टक्के इतके वाढले होते. यासोबत एनटीपीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, हिंडाल्को, युपीएल, कोल इंडिया, ओएनजीसी यांचे समभाग तेजीत होते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून तिचा काहीसा परिणाम बाजारावर सोमवारी पाहायला मिळाला. एकंदरच दिवसभराच्या सत्रामध्ये शेअरबाजारामध्ये चढउताराचा सामना पहायला मिळाला. शेअरबाजारामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या समभागाने दमदार कामगिरी करत विक्रमी स्तरावर समभाग पोहोचला होता. समभागाचा भाव 958 रुपयांवर पोहोचला आहे. 2022 मध्ये हा समभाग जवळपास 22 टक्के वाढला आहे. तर बँक ऑफ इंडियाचे समभाग 3 टक्के इतके वाढताना दिसले. विदेशी बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजार संमिश्र कल दर्शवित होते. युरोपियन बाजारही संमिश्र कल दाखवत होता. आशियाई बाजारामध्ये निक्की 42 अंक, हँगसेंग 842, शांघाय कम्पोझिट 55 अंकांसह वधारत व्यवहार करत होता.