2024 च्या अंतिम सत्रात सेन्सेक्स घसरणीत
विदेशी गुंतवणुकीचाही परिणाम : आशियातील बाजारात नकारात्मक कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी आशियाई बाजारात नकारात्मक कल राहिल्याने भारतीय शेअर बाजारात निर्देशांक सेन्सेक्स प्रभावीत होत बंद झाला. तर निफ्टीही सपाट होत बंद झाला आहे. आयटी समभागांच्या घसरणीदरम्यान अमेरिकेत (यू.एस. ट्रेझरी) वाढत्या बॉण्ड उत्पन्नाचा उदयोन्मुख शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतले. मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 250 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. व्यवहारादरम्यान तो 1100 अंकांवर घसरला होता. तथापि, सेन्सेक्स दिवसाच्या मोठ्या नुकसानातून सावरला. बंद होताना तो 109.12 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 78,139.01 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी-50 0.10 अंकांनी घसरून 23,644.80 वर बंद झाला आणि त्याच्या मागील बंदच्या तुलनेत सपाट राहिला.
2024 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी 8.4 टक्क्यांचा परतावा
निफ्टी आणि सेन्सेक्सने 2024 मध्ये गुंतवणूकदारांना 8.4 टक्के परतावा दिला. तथापि, हे सुमारे 20 टक्क्यांच्या 2023 रिटर्नपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालात आलेली मंदी आणि गेल्या तिमाहीत सततची परदेशी विक्री याचा परिणाम बाजारावर झाला आहे. वर्ष 2024 मध्ये सेन्सेक्स 5,898.75 अंकांनी किंवा 8.16 टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी 1,913.4 अंकांनी किंवा 8.80 टक्क्यांनी वाढला. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने या वर्षी 27 सप्टेंबर रोजी 85,978.25 या त्याच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला आणि त्याच दिवशी निफ्टीनेही 26,277.35 या त्याच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या 30 कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, झोमॅटो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्सचे समभाग वधारुन बंद झाले.
शेअर बाजारातील घसरणीचे कारण
आयटी समभागांच्या विक्रीसह आशियाई बाजारातील घसरणीने देशांतर्गत बाजार खाली खेचले. अमेरिकेतील वाढत्या रोखे उत्पन्नाचा (यू.एस. ट्रेझरी) उदयोन्मुख शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेतील रोखे उत्पन्न आणि डॉलरमधील मजबूती यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतून आपला काही पैसा काढून अमेरिकेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.