For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारी शेअरबाजारात निरुत्साह , 800 अंकांनी सेन्सेक्स घसरणीत

06:12 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
सोमवारी शेअरबाजारात निरुत्साह   800 अंकांनी सेन्सेक्स घसरणीत
Advertisement

निफ्टीही 263 अंकांनी घसरला : सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारात निरुत्साह दिसून आला. सेन्सेक्सने 800 हून अधिक अंकांची घसरण अनुभवली. सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकांनी नकारात्मक कामगिरी केली. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 824 अंकांनी घसरत 75,366 च्या स्तरावर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 263 अंकांनी घसरत 22,829 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाले आहेत. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक कमकुवत दिसून आले. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 2.68 टक्के, 3.51 टक्के घसरले होते. बीएसईवरील सुचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 410 लाख कोटींवर घसरले आहे. याआधीच्या सत्रात ते 419.5 लाख कोटी होते. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा झाले आहेत. निफ्टी मीडिया, धातु, आयटी आणि फार्मा यांचे निर्देशांक 3 ते 4 टक्के घसरणीत होते. बँक, ऑटो, एफएमसीजी व रिअॅल्टी निर्देशांक 1 टक्के घसरणीत होते.

Advertisement

शेअरबाजारात सोमवारी घसरण अनुभवायला मिळाली. 30 पैकी 26 समभाग हे नुकसानीसह कार्यरत होते. तर चार समभाग काहीसे तेजीत होते. आयटी आणि ऊर्जा तसेच ऑटो कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली. ज्याचा परिणाम शेअरबाजारावर दिसून आला. बाजारात घसरणीसाठी काही कारणेही होती. अमेरिकेत नव्याने नेतृत्व हाती घेतलेल्या ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितेचा दबाव बाजारावर दिसला. तसेच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल कमकुवत दिसून आले. भारतीय शेअरबाजारातून सलगपणे विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत हेही एक कारण शेअरबाजारावर दबाव बनवत आहे.

आशियाई बाजारावर नजर फिरवल्यास जपानचा निक्केई 0.92 टक्के घसरणीत होता तर चीनचा शांघाई कम्पोझीट 0.062 टक्के घसरणीसह बंद झाला. कोरीयाचा कोस्पी निर्देशांक सोमवारी बंद होता. एनएसईच्या माहितीनुसार 24 जानेवारी रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 2758 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2402 कोटीचे समभाग खरेदी केले आहेत. 24 जानेवारीला अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.32 टक्के घसरणीसह बंद झाला. नॅसडॅक 0.50 टक्के इतका घसरणीत होता.

याचदरम्यान शेअरबाजारात 29 जानेवारीला डॉ. अग्रवाल्स हेल्थकेयरचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 5 फेब्रुवारीला समभाग एनएसई व बीएसईवर सुचीबद्ध होणार आहे. शुक्रवार 24 जानेवारीला सेन्सेक्स 329 अंकांच्या घसरणीसह 76,190 च्या स्तरावर बंद झाला होता तर निफ्टी 113 अंकांनी घसरत 23,092 च्या स्तरावर बंद झाला होता.

Advertisement
Tags :

.