अंतिम सत्रात सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला
जागतिक घडामोडींचाही प्रभाव : आयटी क्षेत्रावर एआय दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी जागतिक बाजारातील सततच्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. निफ्टी आणि सेन्सेक्सचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिकने घसरून बंद झाले. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या प्रभावामुळे आयटी शेअर्सवर सतत दबाव असल्याने बाजार घसरणीचे चित्र आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने बाजारात मोठी घसरण राहिली.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 82,902 अंकांवर उघडला. मात्र तो अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 1048.16 अंकांनी घसरून 82,626.76 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी देखील अखेर 336.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 25,471.10 वर बंद झाला.
बजाज फायनान्स आणि एसबीआय वगळता बीएसई कंपन्यांचे जवळजवळ सर्व शेअर्स खाली आले. एचयूएल, आयशर मोटर्स, टाटा स्टील आणि टायटन हे टॉप फ्लॉइंगर्समध्ये होते. क्षेत्रनिहाय, निफ्टी मेटल्स इंडेक्स सर्वात जास्त तोटा सहन करत होता आणि 3 टक्के पेक्षा जास्त घसरला. दुसरीकडे, निफ्टी आयटी इंडेक्स आधी 5 टक्केपेक्षा जास्त घसरला होता, परंतु नंतर थोडासा सावरला आणि शेवटी 1.44 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
व्यापक बाजारातही कमकुवतपणा दिसून आला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 1.71 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 1.79 टक्के घसरला. दरम्यान, बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया व्हीआयएक्स 15.18 टक्क्यांनी वाढला जो अनिश्चितता दर्शवत आहे.
जागतिक बाजारात आशियाई बाजारात मंदीचा कल होता. अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित अनिश्चितता आणि टेकमधील विक्रीमुळे जागतिक परिणाम झाला. जपानचा निक्केई सुमारे 1.69, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.5 टक्के, तर एस अँड पी एएसएक्स 1.3 टक्के घसरला.