सप्ताहाच्या प्रारंभी सेन्सेक्स 857 अंकांनी कोसळला
आर्थिक आणि आयटी क्षेत्राचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी सलग पाचव्या सत्रात निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 850 अंकांपेक्षा अधिकच्या नुकसानीत राहिला आहे. यामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांमधील तीव्र घसरणीची नोंद करण्यात आली आहे. अशी स्थिती निर्माण होण्यास अमेरिकेतील मंदावलेल्या वाढीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीमुळे दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 856.65 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 74,454.41 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 242.56 अंकांसह 1.06 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,553.35 वर बंद झाला आहे. बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 4.35 लाख कोटी रुपयांनी घसरून 397.85 लाख कोटी रुपयांवर आले. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनांबद्दलच्या चिंतेमुळे महागाई वाढण्याचे संकेत निर्माण झाले आहेत, असे ताज्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये झोमॅटो, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक घसरणीसह खुले झाले. तर सन फार्मा, मारुती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह आणि नेस्ले इंडियाने सुरुवातीला वाढ नोंदवली. एलटीटीएस, पर्सिस्टंट सिस्टम्स आणि कोफोर्जमुळे निफ्टी आयटी निर्देशांक 1.8टक्क्यांने घसरला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया, धातू, पीएसयू बँक, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक देखील 1 टक्के पेक्षा जास्त घसरले.
खर्चाच्या दबावामुळे अमेरिकन सेवा क्रियाकलापांमध्ये अचानक घसरण झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत त्याचे पडसाद पडले आहेत. व्हाईट हाऊस मेक्सिकोवर चिनी आयातीवर शुल्क लादण्यासाठी दबाव आणत आहे. याचाही दबाव बाजारात दिसला.