सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी मंगळवारी राखली चांगली तेजी
सेन्सेक्स 753 अंकांनी वधारला : एफएमसीजी निर्देशांकाची मोठी तेजी : बँक निफ्टीही तेजीत
वृत्तसंस्था, मुंबई
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार चांगल्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 753 अंकांनी वाढत बंद झाला तर निफ्टी 211 अंकांची तेजी दाखवत बंद झाला. रियल्टी, एफएमसीजी व बँकिंग क्षेत्रांची कामगिरी चांगली दिसून आली.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 753 अंकांच्या वाढीसोबत 79273 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 211 अंकांनी वाढत 24576 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांकही फॉर्मात होता, जो सरतेशेवटी 789 अंकांच्या वधारासह 57371 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील 50 पैकी 35 समभाग मजबूत होत बंद झाले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग तेजीसह बंद होताना दिसले. बँक निफ्टीतील 14 पैकी 13 बँकांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. याचदरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपया 37 पैसे कमकुवत 93.37 वर कार्यरत होता. ब्रेंट व्रुड अर्थात कच्च्या तेलाचे दर 94.73 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत होते.
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता सीपीएसई व फार्मा हे दोन निर्देशांक अल्पशा घसरणीसह बंद झाले. तर ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस आणि रियल्टी यांचे निर्देशांक तेजी राखत बंद झाले. एफएमसीजी निर्देशांक तर तब्बल 1264 अंकांनी वाढत 50820 च्या स्तरावर बंद झालेला दिसला.
हे समभाग तेजीत
समभागांमध्ये पाहता नेस्ले, ट्रेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, इटर्नल, अॅक्सिस बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक, टाटा कंझ्युमर, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंटस्, अदानी पोर्टस, मॅक्स हेल्थकेअर, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, इन्फोसिस, टाटा मोटर्स पीव्ही, मारुती सुझुकी, एसबीआय, इंडिगो व श्रीराम फायनान्स या निफ्टीमधील समभागांनी मजबूती दर्शवली. मिडकॅपमधील बँक ऑफ महाराष्ट्र, ज्युबिलंट फुडस, टाटा इएलएक्सआय, मॅनकाइंड, एलआयसी हा. फायनान्स यांचेही समभाग तेजीत होते.
हे समभाग घसरणीत
मंगळवारी एसबीआय लाइफ, बीईएल, जियो फायनॅन्शीयल, डॉ. रे•िज लॅब्ज, टायटन, रिलायन्स, आयशर मोटर्स, एनटीपीसी, सनफार्मा, पॉलीकॅब, मॅक्स फायनॅन्शीयल, ओरॅकल फायनॅन्शीयल, कमिन्स, एनएलसी इंडिया, एपीएल अपोलो ट्युब्स यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले होते.