For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषकातील जबरदस्त दणके !

06:00 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषकातील जबरदस्त दणके
Advertisement

‘फिफा’ विश्वचषकात आगेकूच करण्याच्या जर्मनीच्या आशांना नुकतीच खीळ बसलीय...त्यांना पॅराग्वेचं आव्हान मोडीत काढता आलं नाही अन् त्यांच्या विश्वचषकातील कारकिर्दीचा विचार केल्यास पेनल्टी शूटआऊटमधील पहिला पराभव पत्करावा लागला...यंदाच्या स्पर्धेतील हा सर्वांत मोठा धक्का...त्याचदिवशी मोरोक्कोसमोर नेदरलँड्सला हात टेकावे लागले तेही पेनल्टीमध्येच आणि आणखी एका अनपेक्षित विजयाची नोंद झाली...या पार्श्वभूमीवर जागतिक करंडकाच्या इतिहासातील फुटबॉल रसिकांबरोबरच विश्लेषकांनाही उताणे पाडणाऱ्या यापूर्वीच्या काही धक्कादायक निकांलावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

Advertisement

1966 (उत्तर कोरिया 1 वि. इटली 0)...

या विश्वचषकातील उत्तर कोरियाचा सहभाग हीच मुळात एक उल्लेखनीय बाब होती, कारण शीतयुद्धाच्या काळातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या फुटबॉल संघटनेनं या देशाला प्रवेश नाकारण्याचा विचार केला होता...त्यातच जाकोमो बुल्गारेली जखमी झाल्यानं इटलीच्या आशांना मोठा धक्का बसला. कारण बदली खेळाडू खेळविण्याची परवानगी नसल्यानं दोन वेळच्या विजेत्या संघावर पाळी आली ती 10 खेळाडूंसह खेळण्याची...सात मिनिटांनंतर पाक डू इकनं विजयी गोल करून इटलीला स्पर्धेबाहेरची वाट दाखवली. विशेष म्हणजे ती उत्तर कोरियाच्या फुटबॉल संघाची जगाला घडलेली पहिली ओळख...या सामन्याचं एक मूळ तिकीट आता ‘फिफा’ संग्रहालयात ठेवण्यात आलंय, तर पाकनं ज्या जागेवरून गोल केला होता ती लोखंडी खिळ्यांचा वापर करून स्पष्ट कळेल अशी व्यवस्था करण्यात आलीय...

Advertisement

1990 (कॅमेरून 2 वि. अर्जेंटिना 1)...

महान दिएगो माराडोनाच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ या लढतीसाठी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा या स्पर्धेतील एकमेव आफ्रिकन चमू असलेल्या आणि पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या कॅमेरूनविऊद्ध त्यांचं पारडं प्रचंड जड मानलं जातं होतं...कारण त्यापूर्वीच्या आवृत्तीचं जेतेपद मिळविलं होतं ते या दक्षिण अमेरिकी राष्ट्रानंच...पण प्रतिष्ठित सॅन सिरो स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कॅमेरूनच्या शिस्तबद्ध खेळानं अर्जेंटिनाला रोखून तर धरलंच, शिवाय दुसऱ्या सत्राच्या मध्यास बियिकनं फ्री-किकवर हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला...

2002 : (सेनेगल 1 वि. फ्रान्स 0)...

हा सामना फ्रान्सच्या फुटबॉल चाहत्यांना नक्कीच विसरायला आवडेल...दक्षिण कोरियाची राजधानी सोल इथं झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सेनेगलच्या पापा बोऊबानं पहिल्या सत्रात केलेल्या गोलमुळं फ्रान्सला पराभवाचा सामना करावा लागला...विचारात घेण्याजोगी बाब म्हणजे सेनेगल त्या वेळी जागतिक यादीत होता 68 व्या स्थानावर. शिवाय विश्वचषकात उतरण्याची त्यांची ती पहिलीच खेप..त्यापूर्वीच्या स्पर्धेतील विजेता फ्रान्स संघ गटात तळाच्या स्थानावर राहिला आणि पहिल्याच फेरीत गारद झाला. 1966 नंतर गतविजेत्या संघावर असा प्रसंग ओढवण्याची ती पहिलीच वेळ होती. सेनेगलनं मात्र आगेकूच करत उपांत्यपूर्व फेरी गाठली....

2002 : (दक्षिण कोरिया 2 वि. इटली 1)...

डच प्रशिक्षक हिडिंक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दक्षिण कोरियानं ‘गट ड’मध्ये अव्वल स्थान पटकावताना साखळी सामन्यात पोर्तुगालचा पराभव करून त्यापूर्वी आपली चुणूक दाखविली होतीच...त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीविऊद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रामध्ये इटलीचा आघाडीपटू क्रिस्तियान विएरानं गोल केल्यामुळे दक्षिण कोरिया पिछाडीवर पडला होता. मात्र 88 व्या मिनिटाला सोल की-ह्योननं गोल करून सामना बरोबरीत आणला आणि त्यानंतर 118 व्या मिनिटाला आन जुंग-ह्वाननं नोंद केली ती निर्णायक गोलाची...त्या वेळी अतिरिक्त वेळेत ‘गोल्डन गोल’चा नियम लागू होता...

2002 : (दक्षिण कोरिया 5 वि. इटली 3)...

उपांत्यपूर्व फेरीत स्पेनविऊद्धचा सामना 120 मिनिटांच्या झुंजीनंतरही गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा चौथा खेळाडू ज्योकिन याला गोल करण्यात अपयश आलं, तर कोरियानं मात्र आपल्या पाचही संधींचं गोलमध्ये रूपांतर करून पुढील फेरी गाठली...सहयजमान दक्षिण कोरियाचा विजयरथ शेवटी उपांत्य फेरीत अडवला तो जर्मनीनं...ते चौथ्या स्थानावर राहिले आणि विश्वचषकातील त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली...

2014 (नेदरलँड्स 5 वि. स्पेन 1)...

‘ब’ गटाच्या सलामीच्या सामन्यात 2010 मधील विश्वचषकाचे मानकरी आणि युरोपियन विजेत्या स्पेननं शाबी अलोन्सोच्या पेनल्टीवरील गोलमुळं आघाडी घेतली. परंतु मध्यंतरापूर्वी रॉबिन व्हॅन पर्सीच्या अविस्मरणीय ‘डायव्हिंग हेडर’नं डच संघाच्या शानदार पुनरागमनाची वाट मोकळी केली...शेवटी नेदरलँड्सनं स्पेनला विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव पत्करायला लावला. स्पेन गटस्तरावरच स्पर्धेतून बाद झाला, तर डच संघानं पटकावलं तिसरं स्थान...

2014 (जर्मनी 7 वि. ब्राझील 1)...

जर्मनीनं उपांत्य फेरीत ब्राझीलचा दारुण पराभव करून त्यांच्याच भूमीवर झालेल्या विश्वचषकात जेतेपदाची आशा बाळगलेल्या स्थानिक चाहत्यांना कमालीचं निराश केलं...या सामन्यात जर्मनीच्या पाच खेळाडूंनी गोलांची अक्षरश: बरसात केली, तर ब्राझीलतर्फे एकमेव गोल करता आला तो 90 व्या मिनिटाला ऑस्करला...या मानहानीकारक निकालानंतर ब्राझीलचे तत्कालीन प्रशिक्षक लुईज फेलिप स्कोलारी यांनी त्याचं वर्णन ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस’ असं केलं. पुढे जर्मनीनं ती स्पर्धा जिंकत आपलं चौथं विश्वविजेतेपद पटकावलं...

2018 (दक्षिण कोरिया 2-जर्मनी 0)...

आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या दक्षिण कोरियाविऊद्ध विजयाची गरज असताना त्यापूर्वीच्या स्पर्धेत विजेता राहिलेल्या जर्मनीला किम यंग-ग्वॉन आणि सोन ह्युंग-मिन यांनी ‘स्टॉपेज-टाइम’मध्ये केलेल्या गोलांमुळं 2-0 अशा पराभवाची नामुष्की सहन करावी लागली...1938 नंतर जर्मनीचं आव्हान गटस्तरावरच संपुष्टात येण्याची ती पहिलीच खेप. खेरीज एखाद्या आशियाई देशाविऊद्धचा विश्वचषकातील त्यांचा तो पहिला पराभव...

2022 (सौदी अरेबिया 2 वि. अर्जेंटिना 1)...

सौदी अरेबियाकडून अर्जेंटिनाचा झालेला पराभव हा कदाचित फुटबॉलच्या इतिहासातील सर्वांत अनपेक्षित निकालांपैकी एक...कागदावर पाहिल्यास जागतिक क्रमवारीत त्यावेळी तिसऱ्या स्थानावर असलेल्या त्या संघाला 51 व्या क्रमांकावरील सौदीला सामोरं जाताना कोणतीही अडचण येण्याचं कारण नव्हतं...परंतु प्रत्यक्षात मात्र अर्जेंटिनाला तीन वर्षांहून अधिक कालावधीनंतर पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यांनी त्या विश्वचषकात पाऊल ठेवलं होतं ते सलग 36 सामन्यांत अपराजित राहण्याच्या कामगिरीसह...लायोनेल मेस्सीनं सुऊवातीलाच पेनल्टीवर गोल केल्यामुळं ते सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचं दिसत होतं. मात्र सौदी अरेबियाच्या सालेह अल-शेहरीनं गोल करून बरोबरी साधली आणि त्यानंतर सालेम अल-दावसारीनं संघाला 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पुढं अर्जेंटिनानं या धक्क्यातून सावरत फिफा विश्वचषक जिंकला खरा, पण सौदीचा हा विजय कायम स्मरणात राहील...

2022 : (जपान 2 वि. जर्मनी 1)...

रशियातील 2018 च्या विश्वचषकात सुऊवातीच्या टप्प्यातच बाहेर पडल्यानंतर सलग दुसऱ्या विश्वचषकात गट फेरीत जर्मनी बाहेर पडेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु ‘गट ई’मधील पहिल्याच सामन्यात जपानकडून त्यांना जोरदार दणका बसला...पहिल्या सत्रात बऱ्याच गोष्टी जर्मनीच्या मनाप्रमाणं घडून इल्काय गुंडोवाननं 33 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत त्यांना आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱ्या सत्रात जपाननं जो विलक्षण जोश दाखविला त्यास त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. दोआन रित्सू नि असानो टाकुमा यांनी केलेल्या गोलांमुळं जर्मन संघ संकटात सापडला....

2022 (मोरोक्को 1 वि. पोर्तुगाल 0)...

कतारमध्ये मोरोक्कोनं इतिहास घडवला...उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत युसेफ एन-नेसिरीनं हेडरवर नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरला आणि त्यामुळं क्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला...त्यासरशी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा मोरोक्को बनला पहिला आफ्रिकन देश...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.