बेंगळुरात स्फोटके सापडल्याने खळबळ
225 जिलेटीन कांड्या, 50 डिटोनेटर जप्त : पोलिसांकडून तपास सुरू, नागरिकांत भीतीचे वातावरण
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळुरात पुन्हा स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवलहळ्ळी येथील काड अग्रहारजवळ तात्काळ कारवाई करत मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर जप्त केले. काड अग्रहार येथील रहिवासी व्यंकटराम रेड्डी r याने बेकायदेशीरपणे स्फोटके साठवली होती. त्याच्याकडून 225 जिलेटीनच्या कांड्या आणि 50 डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासानुसार, जमिनीवरील खडक फोडण्यासाठी ही स्फोटके आणण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तथापि, परवान्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके का साठवण्यात आली, याचा अवलहळ पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. जिलेटीनच्या कांड्या केवळ खडक फोडण्यासाठीच गोळा केल्या होत्या की यामागे दुसरे काही कारण होते, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी स्फोटक कायदा, 1884 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यानही आढळल्या होत्या जिलेटीन कांड्या
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळूर दौऱ्यादरम्यान, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’जवळील रस्त्यावर जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच त्याच प्रकारची स्फोटके पुन्हा सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.