महिला इंटर्न डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ
पणजी : बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज आणि ऊग्णालयात इंटर्नशिप करत असलेल्या केरळमधील 24 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. दोनापावला येथील किनाऱ्यावर काल, बुधवारी हा मृतदेह पाण्याजवळ आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हवाई बीच परिसरात काही नागरिकांना एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडलेला दिसला. याबाबतची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असता, प्राथमिक तपासणीत ती महिला मूळची केरळ येथील असून सध्या गोमेकॉमध्ये इंटर्न डॉक्टर म्हणून सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह तात्काळ पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. जीएमसीच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले असून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाबाबत गोपनीयता बाळगण्यात येत असून, पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली असून, पोलीस प्रशासनाकडून लवकरच या प्रकरणाचा अधिकृत खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घातपात की आत्महत्या?
पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सदर महिला डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हा मृत्यू समुद्रात बुडाल्याने झाला, की ही आत्महत्या आहे अथवा यामागे काही घातपात आहे, या सर्व शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करत आहेत. ती राहत असलेले ठिकाण, तिचे मोबाईल कॉल्स आणि कॉलेजमधील तिच्या सहकाऱ्यांकडे पोलिस सध्या चौकशी करत आहेत.