सावंतवाडीतील 'रेल रोको' आंदोलन पोलिसांनी रोखले
सकारात्मक तोडगा काढण्याची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रवासी संघटनेला ग्वाही
न्हावेली / वार्ताहर
९ वर्षे होऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आज प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी यांच्याकडून रेल रोको चे लक्षवेधी आंदोलन हाती घेण्यात आले होते, या आंदोलनासाठी सकाळी रेल्वे स्थानकात आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते, आंदोलनाची पार्श्वभूमी बघता रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी स्टेशन परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता,यावेळी स्थानकाबाहेर बसलेल्या प्रवासी संघटनेच्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वे चे क्षेत्रीय वाहतूक नियंत्रक श्री.शैलेश आंबर्डेकर आले असता, त्यांच्यावर संतप्त आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मंजूर आहे की नाही ते सांगा, जर झाले असेल ते अद्याप अपुर्ण अवस्थेत का आहे..? वेळोवेळी आंदोलने, उपोषण करुनही का दखल घेतली जात नाही असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.यावर ठोस लेखी लिहून देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली, त्यानंतर श्री.आंबर्डेकर यांनी आंदोलकांना बेलापूर येथील उच्च स्तरीय अधिकारी व प्रवासी संघटना पदाधिकारी यांची बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ आंदोलकांना दिली, त्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करीत आहोत असे जाहीर केले.यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकाचे रखडलेल्या कामासाठी कोकण रेल्वेने निधीची तरतूद याच आर्थिक वर्षात करावी. नवीन प्लॅटफॉर्म किंवा टर्मिनस लूप लाईन चिपळूण स्थानकाचा धर्तीवर सावंतवाडी स्थानकात उभारावे. या स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करावा. या ठिकाणी शून्य आधारित काढून घेण्यात आलेल्या राजधानी, गरीब रथ एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करावे. नव्याने मंगलोर एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, रेल्वे स्थानकात 'सावंतवाडी रेल्वे टर्मिनस' असा बोर्ड लावण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी अध्यक्ष ऍड.संदीप निंबाळकर, सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, मिलिंद देसाई, सुधीर राऊळ, रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ, पांडुरंग नाटेकर, संजय नाटेकर, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईचे गणेश चव्हाण, शांताराम गावडे, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सुहानी गावडे, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, सुभाष शिरसाट, उमेश कोरगावकर, रवी जाधव, विलास जाधव, उमाकांत वारंग, साईल नाईक, केतन गावडे, मेहुल रेडिझ, सचिन गावडे, अजित सातार्डेकर, सुहास पेडणेकर, भुषण मांजरेकर, संदीप राऊळ, सुदेश राऊळ, मनोहर पारकर, रिक्षा व्यावसायिक, रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.