सांगलीतील एका बड्या राजकीय नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगली :
शहरातील हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबाग परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण कुंटुंबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या नेत्याची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विश्रामबाग परिसरातील नामांकीत संस्थेचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्थेवर पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या या पदाधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान सातत्याने सकारात्मक देहबोली असणाऱ्या या नेत्याकडून असा प्रयत्न होणारच नाही अशीही चर्चा होती. एक व्हिजन असणारे हे नेते आहेत. गेल्या काही दिवसापासून आर्थिक कोंडीत अडकल्याने ते दबावाखाली होते, सार्वजनिक जीवनातील वावरही त्यांनी कमी केला होता. गेल्या सहा ते सात महिन्यापासून ते अलिप्तच राहत होते. सोमवारी सकाळी त्यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट त्यांच्या कुंटुंबियांच्या लक्षात आल्यावर कुंटुंबियांनी त्यांना सोडविले आणि एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याची माहिती दवाखान्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी या नेत्याच्या कुंटुंबियांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फक्त आत्महत्येचा प्रयत्न केला इतकीच माहिती दिली. आत्महत्येचा प्रयत्न कोणत्या कारणासाठी केला याबाबत अद्यापही सर्वजण अज्ञानी आहेत असे पोलीसांनी सांगितले.