For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीच्या अपयशास वरिष्ठ खेळाडू कारणीभूत : अम्बाती रायुडू

06:51 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीच्या अपयशास वरिष्ठ खेळाडू कारणीभूत   अम्बाती रायुडू
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला विजेतेपद मिळविता आलेले नाही. त्याचे कारण म्हणजे मोठ्या रकमा देऊन करारबद्ध करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय स्टार नेहमीच दबावाखाली कोलमडले आहेत आणि सर्व भार कनिष्ठ खेळाडूंना उचलावा लागला आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या अनेक आयपीएल चषक जिंकलेल्या संघांचा भाग राहिलेल्या रायुडूने कोणाचेही नाव घेतलेले नसले, तरी त्याचा अंगुलीनिर्देश बहुतेक करून संघाच्या तीन प्रमुख फलंदाजांकडे म्हणजे विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिसकडे आहे. आरसीबीने या हंगामात त्यांचे तीनपैकी दोन आयपीएल सामने गमावले आहेत आणि कोहलीने 140 हून अधिक स्ट्राइक-रेटने 203 धावा केल्या असल्या, तरी पॉवरप्लेच्या दरम्यान त्याला धडाका दाखवता आलेला नाही.

Advertisement

दुसरीकडे, डू प्लेसिसने फक्त 65 धावा केल्या आहेत, तर मॅक्सवेलने आतापर्यंत केवळ 31 धावांचे योगदान दिले आहे. मंगळवारी एलएसजीकडून आरसीबीचा पराभव झाल्यानंतर रायडूने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, आरसीबीचे गोलंदाज नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त धावा देतात, तर त्यांची फलंदाजी अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करते. ‘दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी करणारे सर्व कोण आहेत ? युवा भारतीय फलंदाज आणि दिनेश कार्तिक. मोठी आंतरराष्ट्रीय नावे, ज्यांनी दबाव पेलायला हवा, ते कुठे आहेत ? सर्व जण ड्रेसिंग रूममध्ये परतले आहेत’, असे रायुडू म्हणाला.

महिपाल लोमरोरच्या संदर्भात रायुडू हे म्हणाला. लोमरोरने काही सामन्यांत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरून 230 हून अधिक स्ट्राइक-रेटने धावा केल्या आहेत, तर आरसीबीच्या पंजाब किंग्जविऊद्धच्या हंगामातील एकमेव विजयात दिनेश कार्तिकचा वाटा मोलाचा राहिला. सर्व पॉवरप्ले षटके खेळणाऱ्या वरिष्ठ फलंदाजांसाठी तो एक सोयीस्कर पर्याय असतो. कारण त्यावेळी क्षेत्ररक्षणावर निर्बंध असल्याने धावा काढणे सोपे असते, याकडे त्याने लक्ष वेधले.

Advertisement
Tags :

.