वरिष्ठांची राष्ट्रीय खो खो स्पर्धा उद्यापासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तेलंगणातील काझीपेठ येथे 11 जानेवारी रविवारपासून सुरू होणाऱ्या 58 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या विभागात एकूण 76 संघांचा समावेश राहील. पुरूषांच्या विभागात 38 तर महिलांच्या विभागातही 38 संघ राहतील.
26 राज्ये, 6 केंद्रशाशिसत विभाग, 4 संस्था आणि 3 संघटनेचे सदस्यांचे संघ यामध्ये भाग घेत आहेत. ही स्पर्धा 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संघामध्ये आयटीबीपी आणि एसएसबी संघातील खेळाडू राहतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल पुरूष आणि महिलांच्या विभागात भाग घेणार आहे. सदर स्पर्धेमध्ये अखिल भारतीय पोलीस क्रीडा मंडळाचे संघ पुरूष आणि महिलांच्या विभागात उतरत आहेत. या संघांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब राज्यातील पोलीस दलातील खेळाडू या संघांचे प्रतिनिधीत्व करतील.
केंद्रीयसाशित प्रदेशांमध्ये जम्मू काश्मिर, पुडुचेरी, दिल्ली, दादरा-नगर हावेली, चंदीगड आणि लडाख यांचा समावेश असून हे संघ या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. खो खो संघटनेच्या सलग्न असलेले भारतीय हवाईदल, रेल्वे तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा मंडळ आणि केंद्रीय सशस्त्र दलाचे संघ या स्पर्धेत भाग घेत असल्याची माहिती अखिल भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी दिली.
या स्पर्धेतील सामने सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात खेळविले जातील. प्रकाशझोताची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेतील सामने साखळी बाद पद्धतीने खेळविले जातील. 14 जानेवारीपर्यंत उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने 15 जानेवारीला खेळविले जातील. 57 वी वरिष्ठांची राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा ओडीशातील कुरी येथे 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान गेल्या वर्षी खेळविली गेली होती. त्यामध्ये पुरूष विभागाचे जेतेपद आरएसपीबी संघाने (रेल्वे) तर महिला विभागातील जेतेपद महाराष्ट्राने पटकाविले होते.