सीमालढ्याचा बुलंद आवाज हरपला!
महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांचे निधन
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा-प्रश्नासंदर्भात मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे मध्यवर्ती म. ए. समितीचे खंबीर अध्यक्ष आणि सीमालढ्यातील झुंजार व्यक्तिमत्त्व दीपक दळवी (वय 84) यांचे मंगळवार दि. 17 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सीमाभागातील मराठी भाषिकांचा एक आधारस्तंभ व प्रखर नेतृत्व हरपले आहे. मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बुलंद व कुणाल हे दोन मुलगे, दोन सुना, मुलगी दिलदा, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सीमाप्रश्नासाठी तळमळीने झटणारे नेतृत्व हरपले, अशी भावना मराठी भाषिकांमधून व्यक्त होत आहे.
दीपक दळवी यांनी मागील अनेक दशकांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगावसह सीमाभागातील मराठी माणसांच्या अस्मितेसाठी लढा दिला. सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यात आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता त्यांनी नेतृत्व केले. काही वर्षांपूर्वी समाजकंटकांकडून त्यांच्यावर शाही फेकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचे सीमाभागासह संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले. अशा घटनांनी त्यांनी खचून न जाता आपला लढा अधिक तीव्रतेने उभा केला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सीमाभागात शोककळा पसरली. महाराष्ट्र तसेच सीमावर्ती भागातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दीपक दळवी यांच्या रुपाने सीमाप्रश्नाला दिशा देणारा एक निष्ठावान सेनापती आपण गमावला, अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या.
घनिष्ठ मित्र गमावला
दीपक दळवी यांच्या निधनामुळे मी घनिष्ठ मित्र गमावला आहे. व्यवसायानिमित्त ते काही काळ सांगली आणि मुंबई येथे गेले होते. परंतु 80 च्या दरम्यान पुन्हा बेळगावला आले. त्यावेळी मी त्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आणि त्यांनी ते मानले. मात्र पुढे कधी मैत्री, कधी स्पर्धा असा आमचा प्रवास झाला. ते निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी त्यांच्यासाठी मी प्रचारही केला. पण ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर समितीचे विभाजन झाले. परंतु मनपा निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि समिती अभेद्य राहिली. दळवी घराणे हे समितीनिष्ठ आहे. आमचे वैचारिक मतभेद होत राहिले,परंतु मनभेद नव्हते आणि मैत्रीत मतभेद कधीच आले नाहीत.
- डॉ. किरण ठाकुर,समूह प्रमुख व सल्लागार संपादक, तरुण भारत