सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र
न्हावेली /वार्ताहर
कोकणवासीयांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून कोकण रेल्वेच्या कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून, येथे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध कोकणी वारसा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, सध्या अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या या जिल्ह्यातून थांबा न घेता जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व पर्यटक यांना प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पवार यांनी गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्यांदरम्यान प्रवासाची गर्दी वाढत असल्याचे नमूद करून या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयोगिक तत्वावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या यादीत गोवा संपर्क क्रांती, राजधानी एक्सप्रेस, निजामुद्दीन दुरांतो, मरू सागर एक्सप्रेस, तेने एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.या थांब्यांमुळे विद्यार्थ्यांना,व्यापाऱ्यांना आणि पर्यटकांना प्रवासाची सोय होईल, स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला चालना मिळेल तसेच पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.त्यांच्या या मागणीमुळे कोकणवासीयांच्या दीर्घकाळच्या अपेक्षांना न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.