जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे निधन
काले :
काले (ता. कराड) येथील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमरावदादा धोंडी पाटील (वय 92) यांचे बुधवारी 1 जानेवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर तब्बल 70 वर्षे त्यांनी पकड ठेवली होती.
दादांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दि. 3 रोजी सकाळी 9 वाजता काले येथील प्रतिभानगर येथे होणार आहे. दादांच्या निधनाने कराडसह जिल्ह्यातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
काले गावचे सरपंच म्हणून भीमरावदादा पाटील यांनी 1962 ते 1967 या काळात राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1967 ते 1972 या काळात कराड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले. पुढे 1972 ते 1977 मध्ये ते कराड पंचायत समितीचे सभापती झाले. या काळात कराड पंचायत समितीमध्ये त्यांनी आमुलाग्र बदल केले. अनेक भरीव कामे करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला. 1977 ते 1979 आणि 2005 ते 2008 असे दोनवेळा त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून काम पाहिले. या काळात शेतक्रयांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या.
कृष्णा कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. 1980 ची कराड दक्षिण विधानसभा निवडणूकही भीमरावदादांनी लढवली होती. त्यांना राज्य शासनाकडून दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ हे भीमरावदादांच्या राजकारणाचे वैशिष्ट्या होते. काले पंचक्रोशीत दादांचा शब्द प्रमाण मानला जाई. अतिशय परखड आणि स्पष्टवत्ते म्हणून तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख होती. काले जिल्हा परिषद मतदार संघावर त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते.
बुधवारी पहाटे भीमरावदादांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचे वृत्त कळताच कालेसह संपूर्ण तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काले येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. आमदार डॉ. अतुल भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, संचालक जगदीश जगताप, जितेंद्र पाटील, शेतीमित्र अशोकराव थोरात, धनाजी पाटील, जयसिंगराव कदम, विजयकुमार कदम व नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर गावातून अंत्ययात्रा काढून प्रतिभानगर येथे अंत्यविधी करण्यात आला. काले व परिसरात शोककळा पसरली आहे. काले गावची बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दादांच्या निधनाने कराड दक्षिणच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत आहे.