महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई
मालवण: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर मालवणचे ज्येष्ठ पत्रकार व पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल वसंत देसाई यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या हस्ते प्रफुल्ल देसाई यांना प्रदान करण्यात आले.
MACCIA ही राज्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेली महत्त्वाची संस्था आहे. संस्थेला २०२७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम आणि विकासात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कामात जनसंपर्क, माध्यमे आणि प्रभावी संवादाची भूमिका महत्त्वाची असल्याने संबंधित समितीवर प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रफुल्ल देसाई यांच्या माध्यम क्षेत्रातील अनुभवाचा तसेच पर्यटन क्षेत्रातील कार्याचा समितीच्या कामकाजासाठी उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नकुल पार्सेकर यांच्यासह राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर आणि मिलिंद प्रभू यांनी प्रफुल्ल देसाई यांचे अभिनंदन केले आहे.