For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन; अभ्यासू आणि संयमी नेतृत्व हरपले

10:18 AM Sep 12, 2026 IST | YOGESH KANGUDE
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन  अभ्यासू आणि संयमी नेतृत्व हरपले
Advertisement

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रवक्ते आणि समाजवादी विचारवंत रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेससह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी एक वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र, समाजवादी विचारसरणीच्या प्रभावातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्याचा मार्ग स्वीकारला. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर प्रभाव होता. महात्मा गांधी आणि आगरकर यांच्या विचारांनाही त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात महत्त्व दिले.

Advertisement

आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुढील काळात सामाजिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

काँग्रेसमध्ये काम करताना महाजन यांनी पक्षाचे प्रवक्तेपदही सांभाळले. विशेषतः डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसवर राजकीय दबाव वाढलेला असताना त्यांनी पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडली.

राजकीय चर्चेचा स्तर खालावत असताना महाजन यांच्या सार्वजनिक जीवनातील संयम, विषयाचा सखोल अभ्यास आणि सभ्य भाषेतील मांडणी यांचे विशेष महत्त्व अधोरेखित होते. विरोधकांवर वैयक्तिक टीका किंवा आक्षेपार्ह भाषा न वापरता मुद्द्यांच्या आधारे भूमिका मांडण्याची त्यांची शैली वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली.

समाजवादी विचारांशी बांधिलकी, सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास आणि काँग्रेसप्रती असलेली निष्ठा यामुळे रत्नाकर महाजन यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण झाले होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक अभ्यासू, संयमी आणि वैचारिक नेतृत्व गमावले आहे.

Advertisement
Tags :

.