ज्येष्ठांचे प्रश्न...मोठे आव्हान
सध्या जपानसोबत अन्य देशातही ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत असून एकूण लोकसंख्येत सध्या 10 टक्के असणारे प्रमाण 2050 पर्यंत दुप्पट म्हणजे 20 टक्के होणार आहे. अशा वृद्ध लोकसंख्येचा सांभाळ करणे, त्यांना सन्मानाने व आरोग्यसंपन्न जीवन उपलब्ध करणे, त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्ध संपन्न व अर्थपूर्ण रहावा, हेळसांड, छळवाद, नैराश्य, दारिद्र्या हे त्यांना भोगावे लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येक सुसंस्कृत, जबाबदार कुटुंबांची व समाजाची राहते.
आर्थिक विकासासोबत वाढते राहणीमान, आरोग्य सुविधा, सुरक्षितता यांचा परिणाम लोकसंख्येचे आयुर्मान वाढण्यात झाले. जन्मास येणारी बालके सरासरी किती वर्षे जगतात असे असणारे आयुर्मान केवळ 42 होते ते आता सत्तरीच्या पुढे गेले असून लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे साठी उलटलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण केलेले अतिज्येष्ठ नागरिकही वाढत आहेत. सध्या आपण जरी ‘युवकांचा देश’ या वर्गवारीत असलो व लोकसंख्येचा लाभांश विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास मदतकारी ठरेल असा आशावाद असला तरी वाढणाऱ्या वृद्धांचे प्रमाण किंवा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान पुढे आहे, हे मात्र नक्कीच.
सध्या जपानसोबत अन्य देशातही ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत असून एकूण लोकसंख्येत सध्या 10 टक्के असणारे प्रमाण 2050 पर्यंत दुप्पट म्हणजे 20 टक्के होणार आहे. अशा वृद्ध लोकसंख्येचा सांभाळ करणे, त्यांना सन्मानाने व आरोग्यसंपन्न जीवन उपलब्ध करणे, त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्ध संपन्न व अर्थपूर्ण रहावा, हेळसांड, छळवाद, नैराश्य, दारिद्र्या हे त्यांना भोगावे लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येक सुसंस्कृत, जबाबदार कुटुंबांची व समाजाची राहते. ज्येष्ठ नागरिकांची ‘चंदेरी अर्थव्यवस्था’ ही आनंद, मार्गदर्शन व आशिर्वादाचा मोठा परतावा देत असल्याने ज्येष्ठांच्या प्रश्नांवर योग्य धोरण असावे या भूमिकेतून युनायटेड नेशन्स मार्फत 1990 पासून 1 ऑक्टोबर ज्येष्ठांकरिता आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिन साजरा होतो. ज्येष्ठांचे भारतातील प्रश्न या निमित्ताने पाहणे उचित ठरते.
2024 चा अहवाल व ज्येष्ठांची सद्यस्थिती
जीवन अधिक काळ मिळावे ही नैसर्गिक प्रेरणा असली तरी असे भाग्य असणारे संख्येने अल्पच असतात. परंतु अशा कालखंडात शारीरिक व्याधीसोबत जर दारिद्र्या, अनास्था वाट्यास आली तर मरणाची आतुरलेली वाट पाहणे एवढेच हाती राहते. याबाबत वृद्धांची स्थिती स्पष्ट करणारा ‘हेल्पिंग एज इंडिया’ हा अहवाल 2024 मध्ये प्रकाशित झाला असून तो 10 राज्ये, 20 शहरे व 5200 वृद्धांच्या अभ्यासावर आधारीत आहे. ‘भारतातील वृद्धत्व: पूर्वतयारी व आव्हाने’ या अहवालात वृद्धांची सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी नसल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले असून यातून प्रत्येकाने व एकूण समाजानेही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. त्यातही वृद्ध महिलांचे प्रश्न अधिक तीव्र असून त्या पूर्णत: परावलंबी जीवन जगतात असे दिसते. आर्थिक परावलंबन, आरोग्याचे प्रश्न, सामाजिक एकटेपणा, कौटुंबिक हिंसा, नवतंत्राचा अल्पवापर हे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
आर्थिक परावलंबन
आयुष्यभराची कमाई शिस्तबद्ध, नियोजित पद्धतीने न सांभाळल्याने वृद्धांना आर्थिक परावलंबनाचा किंवा आर्थिक गुलामीचा कालखंड पत्करावा लागतो. वृद्धापकाळासाठी आवश्यक खर्चाची तयारी असणारे फक्त 30 टक्के होते तर अजिबात उत्पन्न नसणाऱ्या महिलांचे प्रमाण 38 टक्के तर पुरूषांचे प्रमाण 27 टक्के होते. वृद्धांचा संपत्तीत वाटा अत्यंत कमी होत असून यात निरक्षरांचे प्रमाण 40टक्के आहेत. 65 टक्के वृद्ध आर्थिक सुरक्षा नसणारे तर 52 टक्के बहुआजारी असणारे होते. पेन्शन असणारे फक्त 9टक्के तर आरोग्य विमा विकत घेतलेले 3 टक्के होते. हे आर्थिक परावलंबन अनेकदा मिळकतीचे वाटप आपल्या मुलांना सुनांना करून नटसम्राट होणारे आर्थिक परावलंबनास आमंत्रित करतात. आपल्या आरोग्यावरही ते खर्च करू शकत नसल्याने 80 टक्के वृद्ध सरकारी दवाखान्यावर अवलंबून आहेत. वृद्धापकाळ समाधानाचा, समृद्धीचा होण्यास आवश्यक आर्थिक पायाच नसेल तर त्यासोबत इतर संकटे आपोआप येतात, असे वृद्ध भारभूत डस्टबिन बनतात.
आरोग्याचे प्रश्न
वृद्धत्वासोबत अनेक प्रकारच्या व्याधी अपरिहार्यप्रमाणे येतात. याबाबत पु. ल. देशपांडे यांनी, जर सकाळी उठताना गुडघे दुखत असतील, अन्य दुखणे वाटत असेल तर तुम्ही जिवंत आहात असा सल्ला ज्येष्ठांना दिला आहे. यातील विनोद बाजूला ठेवला तरी ज्येष्ठांना आरोग्य सुविधांकरिता कुटुंबातील सदस्यावर अवलंबून राहावे लागते. आपल्या आजारावर कुठे व किती उपचार करावेत याचा निर्णय ते स्वत: घेऊ शकत नाहीत. महिलांच्या बाबतीत हा प्रश्न केवळ वृद्धापकाळाचा नव्हे तर तो कायमचाच असतो.
छळवाद व कौटुंबिक हिंसा
कौटुंबिक स्तरावर होणारे दुर्लक्ष, टोमणे, छळ हा मुलाकडून 42 टक्के तर सुनांकडून 28 टक्के होतो, असा निष्कर्ष आहे. त्यातही उत्पन्नाचे मार्ग अजिबात नसणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होतात. या कालखंडात येणारे एकटेपण, नैराश्य यांच्या जोडीला जर कौटुंबिक हिंसा होत असेल तर अशा वृद्धांना मृत्यू हाच मित्र वाटू लागतो. वृद्धापकाळात सेवा, सुश्रुषा यासाठी कुटुंबातील सदस्यावर अवलंबून राहणे त्रासदायक वाटू लागते. संपत्तीतील वाटा मिळाल्यानंतर वृद्धांना घरातून बाहेर वृद्धाश्रमात पाठवणारे वंशाचे दिवे अनेक ठिकाणी दिसतात. 2007 मध्ये पालकांची काळजी व सांभाळण्याची कायदेशीर तरतूद ‘ज्येष्ठ नागरिक कायदा’मध्ये केली आहे.
एकटेपणा व सोशल मीडिया
वृद्धापकाळात अनेक मित्र हरवले जातात. नवे मित्र शोधणे अवघड होते व त्यातून येणारे नैराश्य हे एकटेपणा निर्माण करते. जे केवळ करियर, पद, प्रतिष्ठा याचाच ध्यास घेऊन साठी गाठतात त्यांना हा तुटकपणा अधिक तीव्र असतो. औषधांच्या गोळ्या ऐवजी मित्रांच्या टोळ्या, हे महत्त्वाचे असते. विविध क्षेत्रातील, स्तरातील मित्र जोपासणे, छंद जोपासणे ही सवय जाणीवपूर्वक विकसित केल्यास ही समस्या राहत नाही. सध्या नवतंत्राचा, स्मार्टफोनचा वापर वृद्धांकडून वाढत असून डिजीटल मैत्री वाढते आहे. स्मार्ट फोन वापरणारे वृद्ध 40 टक्के असून त्यात केवळ करमणूकीसाठी वापर करणारे 34 टक्के व आर्थिक व्यवहार करणारे 12 टक्के आहेत.
शासनाची मदत
वृद्धांच्या आर्थिक तसेच आरोग्यविषयक अडचणीसाठी सरकारच्या विविध योजना असून अटल पेन्शन, वयोवंदना योजना यासोबत आरोग्यासाठी आयुष्मान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) अशा विविध योजना असून ज्येष्ठांना प्रवास खर्चात सवलत, तीर्थाटनास मदत दिली जाते. पण शासनाच्या सवलती व एकूण गरज यात मोठे अंतर असल्याने व्यापक सामाजिक सुरक्षा योजना तयार करणे आवश्यक आहे.
सन्मानीत वृद्धत्त्व:
आपली सेकंड इनिंग किंवा साठीनंतरची जीवनशैली आनंददायी, सक्रिय ठेवणे हीच सन्मानीत वृद्धत्वाची गुरूकिल्ली आहे. आर्थिक स्वावलंबन हे आर्थिक नियोजन योग्यरित्या करणे, मृत्यूपत्र व अन्य व्यवहार स्पष्टता ठेवणे, अकारण सल्ले, निष्कारण सहभाग, यावर स्वनियंत्रण अनेक कटूप्रश्न व प्रसंग टाळू शकतो. आपल्या क्षमतेप्रमाणे इतरांना उपयुक्त राहण्याचा प्रयत्न आपणासही आनंद देतो. यासाठी विविध क्लब, मंडळे यात सहभाग ठेवणे, आरोग्याकडे लक्ष देणे या सर्वात आपली सकारात्मक मानसिकता जोपासणे यातून संध्याछाया भिवविती असे वाटणार नाही. येणारा प्रत्येक दिवस हा ‘प्रसाद’ स्वरुपाचा असून हे जीवन भाग्य आनंदी, उत्साही, समर्पित करणे आपल्याच हाती आहे. ज्येष्ठ हे समाजाचे रुपेरी भांडवल (एग्त्न ण्aज्ग्taत्) असते. त्याचा सूज्ञपणे वापर अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्यास उपयुक्त ठरते.
-प्रा. डॉ. विजय ककडे