For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाच्या सावळ्या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त

10:31 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाच्या सावळ्या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त
Advertisement

घरपट्टीच्या चलनामध्ये दुपटीने वाढ : विचारणा केली असता निवडणुकीनंतर पाहूचे उत्तर

Advertisement

बेळगाव : घरपट्टी असो किंवा व्यावसायिक कर असो, नवीन आर्थिक वर्षापासून त्यामध्ये दरवर्षी बदल केला जातो. पाच ते दहा टक्के या करात वाढ केली जाते. पण यावर्षी करवाढीचे कोणतेच नियोजन नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. काहीजणांचे चलन तब्बल दुपटीपेक्षाही अधिक वाढवून दिले आहे. याबाबत महानगरपालिकेकडे विचारणा केली असता निवडणुकीनंतरच त्याकडे गांभीर्याने पाहू, असे उत्तर दिले जात आहे. मात्र यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका चलनद्वारे व ऑनलाईनद्वारे घरपट्टी जमा करून घेत असते. यावर्षी अजून तरी ऑनलाईनचा गुंता सुटला नाही. घरपट्टी वाढीबाबतही योग्य मार्गसूची दिली नाही. शहरातील विविध विभागांमध्ये वेगवेगळी घरपट्टी आकारली जाते. याचबरोबर त्या इमारतीच्या मूल्यमापनावर घरपट्टी आधारीत असते. मात्र मागील वर्षीपेक्षा दुप्पट करवाढीचे चलन दिले जात आहे. त्यामुळे कर भरायचा की नाही? असा प्रश्न पडला आहे.

अॅड. रघुनाथ दळवी यांना घरपट्टी दुप्पटवाढीचे चलन दिले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. वास्तविक मनपाने शहरामध्ये असलेल्या मनपाच्या विभागीय कार्यालयामध्ये दर वाढीबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. त्यामुळे गैरप्रकार व गैरसमज दूर होऊ शकतो. मात्र महानगरपालिका कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी गुंतले आहेत. त्या कामामुळे याकडे लक्ष देणे अवघड झाल्याचे मनपातील कर्मचारी सांगत आहेत. मात्र यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. काहीजणांची घरपट्टी दुप्पटीने वाढली. त्यामध्ये काही तरी चुकीची नोंद झाली हे खरे आहे. अशा चुकीच्या नोंदी झाल्या असतील तर तातडीने दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. दुरुस्ती झाली तर संबंधितांना घरपट्टी भरणे सोपे जाणार आहे. तेव्हा मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.