सेनीने गंडविले आणखी 15.50 लाख
सांगेतील व्यक्तीच हडप केले 15.50 लाख : पहिल्यांदा मदतीचा नंतर कायम ठेवीचा बहाणा,सेनी उर्फ तन्वी, बँक मेनेजरच्या कोठडीत वाढ
कुडचडे : कुडचडेत राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून दिशाभूल करून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या प्रकरणाला अनेक फाटे फुटू लागले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेली संशयित आरोपी सेनी कुलासो उर्फ तन्वी आणि बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. काल गुरुवारी या सेनीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला ज्यात तिने सांगे येथील व्यक्तीला साडेपंधरा लाखांचा गंडा घातल्याचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या सांगेतील कॉस्तान्सियो फर्नांडिस या व्यक्तीला सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्तने अनोख्या पद्धतीने 15 लाख 50 हजारांना फसविल्याचे समोर आले आहे. कॉस्तान्सियो यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे, या प्रकरणाला सुऊवात मार्च, 2024 मध्ये झाली. ते मार्च महिन्यात लंडनमधून सांगे येथील घरी आले होते. त्यावेळी जेव्हा बँक खात्याचा अहवाल घेण्यासाठी सेंट्रल बँक काकोडा शाखेत आले तेव्हा त्यांची भेट सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्तशी झाली. वयस्क व आजारी असलेल्या कॉस्तान्सियो यांना तिने आपण मदत करते असे सांगून त्यांना संबंधित खात्याची माहिती दिली.
कायम ठेवीचा बहाणा, बनावट प्रमाणपत्र
त्यानंतर कॉस्तान्सियो परत काही दिवसांनी बँकेत पैसे काढण्यासाठी आले तेव्हा सेनी कुलासो उर्फ तत्वी ही बँकेची कर्मचारी असल्याचे गृहीत धरून त्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि खात्यातून 20 हजार ऊ. काढायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर तिने त्यांच्या धनादेशावर सही घेतली आणि यावेळी संधी साधून आणखी पाच धनादेश चेकबूकमधून फाडले. त्या धनादेशांच्या मदतीने तिने 1.50 लाख रु. काढले. त्याशिवाय एका बँक अर्जावर कॉस्तान्सियो यांची सही घेतली आणि 14 लाखाची कायम ठेव ठेवल्याचे सांगून हातांनी लिहिलेले बनावट प्रमाणपत्र कॉस्तान्सियो यांच्या हातात सोपविले.
अन्य खात्यात वळविले 10 लाख रु.
या घडामोडीत सेनी कुलासो हिने 10 लाख रु. त्याच बँकेत खातेधारक असलेल्या अन्य एका महिलेच्या खात्यात वळविले. त्यानंतर सदर खातेधारकाला फोनच्या माध्यमातून बँकेच्या चुकीमुळे तिच्या खात्यात 10 लाख ऊ. जमा झाले असल्याचे सांगून ते काढून देण्यासाठी बोलावून घेतले. यावेळी तिला 10 लाख रु. खात्यातून काढायला लावले. सदर रक्कम त्या महिलेकडून बँकेच्या बाहेर राहून सेनी कुलासोने आपल्याकडे घेतले, असे समोर आले आहे. सदर महिला बँक व्यवहारात जाणकार नसल्यामुळे व सेनी कुलासो ही बँकेची कर्मचारी असल्याचे मानून ती रक्कम या महिलेने तिच्या हाती सोपविली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे एकूण 15 लाख 50 हजारांचा चुना वेगवेगळ्या प्रकारे कॉस्तान्सियो फर्नांडिस यांना लावण्यात आला असे दिसून आले आहे.
ज्या प्रकारे ही फसवणूक करण्यात आली आहे ते पाहता फक्त एक व्यक्ती इतके गैरप्रकार करू शकत नाही, असे दिसून येत असून याचे पुरावेही सापडले असले, तरी सदर साथीदार सेनीला फक्त पैशांसाठी मदत करत होता की, त्यामागे अन्य काही कारण आहे, यावर कुडचडेत चर्चा रंगू लागली आहे. बुधवार संध्याकाळपर्यंत एकूण 17 तक्रारी कुडचडे पोलिसस्थानकात पोहोचल्या होत्या व त्यातील चार तक्रारींवर पोलिस कारवाई सुरू झाली आहे. सेनी कुलासो उर्फ तन्वी हिने साथीदाराच्या साहाय्याने केलेले एकेक कारनामे उघड होत आहेत. कुडचडेतील जनता या दिवसांत सुरू झालेल्या थंडीपेक्षा सध्या उघड होत असलेल्या अपेक्षेपलीकडच्या कारनाम्यांमुळे गोठून गेली आहे, अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होताना ऐकायला मिळत आहेत. सध्या सुऊ असलेल्या नोकरी घोटाळ्यामुळे बसणारे धक्के चालू आहेत. त्यात कुडचडेतील सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त आणि सेंट्रल बँक काकोडा शाखेचा व्यवस्थापक यांच्या कारनाम्यांनी फक्त कुडचडेतीलच नव्हे, तर पूर्ण राज्यातील लोकांना धक्के दिलेले आहेत.