‘शेख हसीनांना परत पाठवा’
बांगलादेशच्या युनूस सरकारची भारताकडे मागणी
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. बांगलादेशने सोमवारी भारताला औपचारिक राजनैतिक संदेश (डिप्लोमॅटिक नोट) पाठवून हसीना यांना पुन्हा खटल्याला सामोरे जाण्याची विनंती केली. बांगलादेशने पहिल्यांदाच भारताकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची औपचारिक मागणी केली आहे. आता युनूस सरकारच्या मागणीवर भारत काय भूमिका घेते यावर शेख हसीना यांचे भवितव्य ठरणार आहे.
शेख हसीना बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान ऑगस्ट महिन्यात भारतात आल्या होत्या. त्यांच्यावर 225 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर खटले चालवण्यासाठी बांगलादेशने भारताकडे त्यांची मागणी केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांनी ढाका येथील डेली स्टारला सोमवारी यासंबंधी माहिती दिली. आम्ही भारत सरकारला राजनैतिक संदेश पाठवला आहे. बांगलादेश सरकार हसीना यांना न्यायिक प्रक्रियेसाठी परत आणू इच्छित आहे. बांगलादेशचा भारतासोबत कैदी विनिमय करार (प्रत्यार्पण करार) आहे. या कराराअंतर्गत शेख हसीना यांना परत आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडे मागणी केली जाईल असे गेल्या महिन्यात सांगितले होते. त्यानुसार आता शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशने भारताला डिप्लोमॅटिक नोट पाठवली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांनी याला दुजोरा दिला आहे. हसीनांविरुद्ध हत्या, अपहरणापासून देशद्रोहापर्यंत 225 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर भारतात असताना हसीना यांनी केलेली वक्तव्ये दोन्ही देशांमधील संबंध बिघडवत असल्याचा बांगलादेश सरकारचा आरोप आहे.