समुद्रकिनारी लगत गावांच्या अभ्यासासाठी चर्चासत्र संपन्न
मालवण : प्रतिनिधी
समुद्रकिनारी लगतच्या गावांमधील सामाजिक, पर्यावरणीय, आरोग्यविषयक तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत वायरी-भुतनाथ येथे मंगळवारी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत गावाचा सर्वांगीण अभ्यास करण्यात येणार असून स्थानिक नागरिकांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.या कार्यक्रमात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) तर्फे ब्रिनेल डिशोजा व रेखा मोमन उपस्थित होत्या. तसेच युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (यूके) येथील प्रा. इयन लेक व प्रा. जो. श्रीअर यांनीही सहभाग घेतला. स्थानिक स्तरावर एस. आर. ए. महाविद्यालयाच्या डॉ. अनुराधा गावडे यांनी अभ्यास प्रकल्पाची माहिती देत समुद्रकिनारी भागांमध्ये हवामान बदल, किनारी धूप, आरोग्यविषयक प्रश्न आणि उपजीविकेवर होणारे परिणाम यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत वायरी-भुतनाथचे सरपंच भगवान रघुनाथ लुडबे, उपसरपंच प्राची पराग माणगावकर, ग्रामविकास अधिकारी गौरव प्रकाश दळवी, ग्रामपंचायत अधिकारी सागर देसाई, जीवरक्षक जितेंद्र मायबा, मातृ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष लुडबे, हरिश्चंद्र वेगुर्लेकर, दिक्षा लुडबे, आरोग्य सेवक संभाजी पांडुरंग आचरेकर, नम्रता भगत, विजया गोसावी, गौरी लुडबे, अंगणवाडी सेविका, दिपाली झाड (अंगणवाडी मदतनीस), दिशा मालवणकर (ग्रामसखी उमेद) तसेच आशा स्वयंसेविका अर्चना तळवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शासकीय कर्मचारी उपस्थित होते.चर्चासत्रादरम्यान स्थानिक पातळीवरील आरोग्य, शिक्षण, रोजगार, आपत्ती व्यवस्थापन, किनारी भागातील बदलते वातावरण, मत्स्यव्यवसाय आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांच्या अनुभवांमधून मिळणारी माहिती अभ्यासासाठी महत्त्वाची ठरणार असून त्याआधारे भविष्यातील विकासात्मक धोरणे आखण्यासाठी मदत होणार असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.ग्रामपंचायत कार्यालय, वायरी-भुतनाथ येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत संशोधकांकडून गावभेटी, सर्वेक्षण, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे माहिती संकलित केली जाणार असून समुद्रकिनारी भागातील नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अभ्यासातून समोर येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.