स्वायटेक-गॉफ यांच्यात उपांत्य लढत
वृत्तसंस्था / माद्रीद
पोलंडची द्वितीय मानांकित इगा स्वायटेक आणि अमेरिकेची चौथी मानांकित कोको गॉफ यांच्यात येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्य लढत होणार आहे. स्वायटेकने मॅडिसन किजचा तर गॉफने रशियाच्या 18 वर्षीय मिरा अॅन्ड्रीव्हाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. पुरुष विभागात मॅटो अमार्डीने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इगा स्वायटेकने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 0-6, 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या लढतीत मॅडिसन किजने आपल्या दमदार आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर स्वायटेकला पहिल्या सेटमध्ये एकही गेम जिंकण्याची संधी न देताना हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकला. मात्र त्यानंतर पुढील दोन सेटमध्ये स्वायटेकने आपल्या खेळाच्या डावपेचात बदल करत आणि अनुभवाच्या जोरावर मॅडिसन किजचे आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या 21 वर्षीय कोको गॉफने रशियाच्या मिरा अॅन्ड्रीव्हाचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. डब्ल्युटीए टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत 2009 नंतर उपांत्यफेरी गाठणारी कोको गॉफ ही तरुण टेनिसपटू आहे. मिरा अॅन्ड्रीव्हाने 18 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्पर्धेदरम्यान वीज प्रवाह खंडीत झाल्याने किमान 20 सामने लांबणीवर टाकण्यात आले होते.
पुरुषांच्या विभागात मॅटो अमाल्डीने फ्रांन्सीस टिफोईचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अमाल्डीने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचला पराभवचा धक्का दिला होता. आता इटलीचा अमाल्डी पुढील फेरीत जॅक ड्रेपरशी लढत देईल. जॅक ड्रेपरने टॉमी पॉलचा 6-2, 6-2 अशा सळर सेट्समध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. सहाव्या मानांकीत ड्रेपरने चालु वर्षीच्या प्रारंभी झालेल्या इंडियन वेल्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.