सेमीकंडक्टर उलाढाल 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहचणार
मंत्री जितीन प्रसाद यांची माहिती : संसदेत दिली माहिती, अन्य योजनांही मार्गी लावण्यात येणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चिप डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भारत वेगाने विकसित होत आहे. भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठेची उलाढाल 2030 पर्यंत 100 अब्जपर्यंत पोहोचेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत सांगितले आहे. यामध्ये चिप मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी (चिप फॅब्स), डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी, चिप टेस्टिंग आणि पॅकेजिंग प्लांट्ससाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (पीएलआय)चा सहारा आहे. याशिवाय चिप डिझाइनला प्रोत्साहन देण्यासाठी पीएलआय योजना देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक घटक उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनास प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोहाली येथे असणाऱ्या सेमीकंडक्टर प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण करण्याचीही योजना आहे, ज्यामुळे हे ध्येय साध्य करण्यात मदत होईल. भारतातील सेमीकंडक्टर उलाढाल झपाट्याने वाढत आहे. 2023 मध्ये ती 38 अब्ज डॉलर्स होती, जी 2030 पर्यंत 109 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. म्हणजे दरवर्षी सरासरी 16 टक्क्यांची वाढ होत जाणार असल्याचेही नमूद केले आहे.
गुजरातमधील कारखान्याची भूमिका
गुजरातमधील धोलेरा येथे उभारण्यात येणारा चिप कारखाना या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. हे टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानच्या पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनने संयुक्तपणे विकसित केले आहे. सरकारचे म्हणणे आहे की कारखाना 2027 पर्यंत तयार होईल आणि दरवर्षी 3 अब्ज चिप्स तयार करेल. यासाठी एकूण 10.9 अब्ज डॉलर्स खर्च केले जातील, ज्यामध्ये सरकारचेही सहकार्य असणार आहे.