अव्यभिचारिणी भक्ती
अध्याय नववा
सत्व, रज व तमोगुणाचा तौलनिक अभ्यास आपण समजून घेतला. आपल्या स्वभावातील रज आणि तमोगुणाचं आधिक्य नाहीसं होऊन सत्वगुण वाढीला लागायला हवा हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे आणि आपला स्वभाव सत्वगुणी व्हावा यासाठी प्रयत्न करायला लागल्यावर हे काम आपल्या आवाक्यातलं नाही याचीही खात्री पटते. असं झालं की, ईश्वराला शरण जाऊन त्याची करुणा भाकावी व म्हणावं की, देवा हे तुझ्या कृपेशिवाय अशक्य आहे, तेव्हा माझ्यावर कृपा कर आणि मला सत्वगुणी बनव. यावर ईश्वराला दया येऊन हळूहळू आपल्या स्वभावात बदल घडू लागेल. पुढेपुढे तर आपला स्वभाव इतका बदलतो की, इतरेजन कसेही वागले तरी आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम न होता आपलं वागणं सत्वयुक्त होत राहतं. आता आपल्याला सत्वगुणाचीही गरज भासत नाही. रज, तम, गुण तर आपण केव्हाच बाजूला काढलेले असतात आणि सत्वगुणाचीही आपल्याला गरज भासत नाही. थोडक्यात गुणांना आपल्या आयुष्यातून वजा करून आपण त्यांच्याशिवाय जगू शकतो आणि असं जगणंच ईश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे. थोडक्यात आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याचा उत्तम योग साधण्यासाठी ही आवश्यक पात्रता आहे कारण ईश्वर स्वत: या त्रिगुणांच्या म्हणजे मायेच्या पलीकडे असतात आणि आपण जर मायेच्या पलीकडे म्हणजे जेथे सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीत तेथे पोहोचलो तर आपल्याला ईश्वर निश्चितच भेटतील. गीतेत अर्जुनाला भगवंत सांगतात की, हे आव्हान माणसाच्या कुवतीच्या बाहेरचं आहे पण जे माझी कास धरतील तेच फक्त माझ्या कृपेनं या संसार सागरातून पोहून पलीकडे जाऊ शकतील. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पुढील श्लोकात बाप्पा हाच मुद्दा सांगत आहेत.
ततश्च सर्वभावेन भज त्वं मां नरेश्वर ।
भक्त्या चाव्यभिचारिण्या सर्वत्रैव च संस्थितम् ।। 35।।
अर्थ- गुणातीत झाल्यानंतर हे नरेशा, सर्व भावाने सर्वत्र स्थित असलेल्या माझी अव्यभिचारिणी भक्ति कर.
विवरण- बाप्पा सांगतायत की, गुणातीत होऊन अव्यभिचाराने म्हणजे केवळ माझ्यावर निष्ठा ठेवून माझी भक्ती कर. अशी भक्ती करणं अनन्य भक्तालाच शक्य आहे. परिस्थिती कोणतीही असो, कितीही संकटं येवोत, अनन्य भक्ताची श्रद्धा कधीही डळमळीत होत नाही. संत साहित्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की, शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांचे अभंग, आत्ताचा समाज डोक्यावर घेतोय पण प्रत्यक्षात ते जेव्हा होते तेव्हा जितका म्हणून त्रास देता येईल तेव्हढा लोकांनी त्यांना दिलेला आहे. नुसती संतांची, भक्तांची नावे जरी आपण आठवली तरी त्यांनी सोसलेल्या त्रासांची वर्णने डोळ्यापुढे उभी राहतात आणि अंगावर शहारा येतो. त्याचबरोबर त्यांनी ईश्वराशी एकनिष्ठ राहून त्यानी केलेली अनन्य भक्तीही आठवते. संपूर्ण निरपेक्ष होऊन ईश्वरभक्ती करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते आणि विपरीत परिस्थितीत न डगमगता त्यांनी ते साध्य केले. त्यासाठी समर्थ सांगतात की, मना श्रेष्ठ धारिष्ट्या जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे. ईश्वरभक्ती हे आयुष्याचे ध्येय साध्य करत असताना त्यासाठी आवश्यक असलेले श्रेष्ठ धारिष्ट्या त्यांना, समोर दिसणारा संसार हा फक्त भास असून, सर्वत्र भरलेला ईश्वर फक्त सत्य आहे या जाणिवेतून येते. इतर कोणत्याही गोष्टीला अस्तित्वच नाही आणि ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांची फिकीर करायचं काहीच कारण नाही हे त्यांना उमजलेलं असतं. त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला तो केवळ त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम होता. त्यातील भोग सहन करून संपवला की, आपला देह मुक्त होईल हेही त्यांना आत्मज्ञानाने कळलेले असते. म्हणून त्यांना त्रास देणाऱ्याबद्दल त्यांच्या मनात कोणताही आकस नसतो.
क्रमश: