विकसित गोव्याचा स्वयंपूर्ण अर्थसंकल्प
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती : प्रामुख्याने पर्यटन क्षेत्रातील साधनसुविधांचा विकास,आरोग्य, शिक्षण क्षेत्रावर भर
पणजी : विकसित भारत 2024 चे स्वप्न पूर्ण करताना गोव्याला त्यापूर्वीच म्हणजे 2037 या साली दहा वर्षे अगोदरच स्वयंपूर्ण विकसित गोवा करण्याचे आपले ध्येय आहे. त्या दिशेने सरकारचे काम सुरू आहे. विकसित भारत 2047 आणि स्वयंपूर्ण गोवा या तत्त्वाला महत्त्व देत गोवा सरकारचा 28 हजार 162 कोटी ऊपयांचा 2025-2026 या सालचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या चेंबरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट, अश्विन चंद्रू उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, 2 हजार 400 कोटी ऊपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक आज विधानसभेत सादर केले आहे.
प्रामुख्याने पर्यटन क्षेत्रातील साधनसुविधांचा विकास करण्यासाठी तसेच आरोग्य क्षेत्रासाठीची अत्याधुनिक यंत्रणा आणि शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यासाठी सरकारने हा या क्षेत्राला वाहिलेला यंदाचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी अंत्योदर तत्वाचा अंगीकार करून युवा, महिला विकास, गरीब कल्याण यांना प्राधान्य देणारा शिल्लकीचा अंदाजपत्रक सादर केला. यात कृषी, वीज, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, खाण विकास यांना प्रामुख्याने प्राधान्य दिलेले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यातील महिला, युवक, शेतकरी, दिव्यांगजन, विद्यार्थी तसेच गोवा राज्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयांच्या इच्छा आकांक्षांना न्याय देणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय यांचे भान राखणारे आणि स्वयंपूर्ण गोवा ह्या संकल्पनेला मजबूत करणारा अर्थसंकल्प गोव्याच्या जनतेसाठी समर्पित केला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.