दारूगोळ्याप्रकरणी आत्मनिर्भर भारत
नवी दिल्ली :
भारत आता स्वदेशी तोफखाना दारूगोळा निर्माण करत आहे. डीआरडीओ यावर वेगाने काम करत आहे. याचा उद्देश विदेशावरील निर्भरता कमी करणे आहे. मागील 2 वर्षांमध्ये 155 एमएम तोफांच्या चार प्रकारच्या गोळ्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. हे परीक्षण यशस्वी ठरले आहे. सैन्याच्या गरजा पूर्ण करणे किंवा त्याहून अधिक चांगली कामगिरी करणारे हे तोफगोळे आहेत. यात हाय एक्सप्लोसिव्ह, स्मोक आणि डीपीआयसीएम गोळे सामील आहेत. नोव्हेंबरपर्यंत यांचे अंतिम परीक्षण होणार आहे. सैन्याला हे तोफगोळे योग्य वाटल्यास मोठ्या प्रमाणावर त्यांची ऑर्डर दिली जाऊ शकते. भारतात निर्मित तोफगोळे सर्व निकष पूर्ण करणारे ठरल्यास भारत याप्रकरणी आत्मनिर्भर ठरणार आहे. या दारूगोळ्याचा विकास जवळपास पूर्ण झाला आहे. आता वापराच्या पार्श्वभूमीवर परीक्षणाची तयारी आहे. वापरकर्ते पूर्वीच प्रकल्पात सामील आहेत, याचा अर्थ सैन्य देखील या विकास प्रक्रियेत सामील आहे. हा दारूगोळा ‘डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर (डीसीपीपी)’अंतर्गत निर्माण केला जात आहे.
प्रकल्पात दोन कंपन्या सामील
या प्रकल्पात दोन कंपन्या सामील आहेत. या कंपन्या प्रथम प्रोटोटाइप निर्माण करतील, मग सैन्याला मोठ्या संख्येत दारूगोळा पुरविणार आहेत. भारत आणि जगभरात तोफगोळ्यांची मोठी मागणी आहे. भारताला पुढील 10 वर्षांमध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दारूगोळा लागणार आहे. तर निर्यात याहून अनेक पट असू शकते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची जय अॅम्युनिशन लिमिटेड आणि सरकारी कंपनी यंत्र इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या डीआरडीओसोबत मिळून दारूगोळा निर्माण करत आहेत. डीपीआयसीएम दारूगोळ्याचा वापर मोठ्या भागाला लक्ष्य करण्यासाठी केला जातो. यामुळे शत्रूला अधिक नुकसान पोहोचविले जाऊ शकते.